अन्यथा तुळस ग्रामपंचायतवर घागर मोर्चा : ग्रामस्थ महिलांचा इशारा
वेंगुर्ले | प्रतिनिधी : तुळस गावातील सावंतवाडा, खरीवाडी, चुडजीवडी, जकातनाका, राऊळवाडी इथे 31 मार्च पूर्वी पिण्यायोग्य पाणी मिळावे अन्यथा ग्रामपंचायत तुळस वर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थ महिलांनी तुळस ग्रामपंचायत ला निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच खरीवाडी, राऊळवाडी, सावंतवाडा येथे स्वतंत्र पाण्याची टाकी व्हावी तसेच चुडजीवाडी जकातनाका वाडी करीता पिण्याची पाण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी व्हावी तसेच सरकारची जलजीवन मिशन योजना तुळस गावात राबवत असताना पद्धतशीर पणे पिण्यायोग्य पाण्याचे नियोजन करावे. तसेच भूजल दाखला आणि संपूर्ण कागदपत्रे पूर्ण केल्यावरच पाण्यासंदर्भात काम चालू करावे. या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते वैभव होडावडेकर यांनी सांगितले.
महिलांनी हे निवेदन तुळस ग्रामपंचायत ला सरपंच रश्मी परब आणि उपसरपंच सचिन नाईक यांच्या उपस्थितीत दिले. त्यावर सगळी कागदपत्रे तपासून निर्णय घेण्यात येईल लवकरात लवकर पिण्यायोग्य पाणी सर्वांना देण्याचे आश्वासन सरपंच व उपसरपंच यांनी दिले. यावेळी वैभव होडावडेकर यांच्या सह सुभाष सावंत, सुधीर चुडजी, संतोष राऊळ, उमेश चुडजी, हनुमंत गावडे, अखिलेश चुडजी, रोशन आंगचेकर, सिद्धेश तुळसकर, वृषाली चुडजी, सुनीता तुळसकर, पल्लवी चुडजी, भारती चुडजी, अर्चना चुडजी,नाना राऊळ, हर्षवर्धन तांबोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तुळस गावामध्ये शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत शासनाचा करोडो रुपये निधी खर्च करून राबविल्या जाणाऱ्या नळ पाणी योजनांची कामे करत असताना त्या त्या ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल खात्याचा दाखला घेऊन कामे करण्यात यावीत जेणेकरून त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही . यापूर्वी गावामध्ये अशाच प्रकारची कामे करत असताना बोरवेल खोदून त्या ठिकाणी पाणीही मिळालेली नाही. तसेच अनेक कामे प्रलंबित आहेत त्यामुळे तुळस गावामध्ये जलजीवन मिशन अथवा अन्य पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केली जाणारी नळ पाणी योजनांची व पाण्यात संबंधी सर्व कामे शासन नियमानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करून करण्यात यावीत.
शासनाचा करोडो रुपये निधी खर्च करून केली जाणारी कामे नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर रित्या केली गेल्यास संबंधित अभियंत्यासह सर्व अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांना त्यासाठी सर्वस्वी जबाबदार धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन झालेल्या खर्चाची संबंधितांकडून वसुली करण्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान माहिती व कार्यवाहीसाठी या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ले यांनाही दिल्याचे वैभव होडावडेकर यांनी सांगितले.