दापोली येथे २२ रोजी पुज्य शिंदे गुरूजी स्मृती मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रम

Google search engine
Google search engine

कुणबी सेवा संघ दापोलीचा उपक्रम

संतोष कुळे | चिपळूण : कुणबी सेवा संघ दापोली यांच्या वतीने नवभारत छात्रालयाचे संपादक पुज्य सामंत गुरूजी यांच्या ५७ व्या आणि सेवाव्रती शिंदे गुरूजी यांच्या १६ व्या स्मृतीदिनानिमित्त रविवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्मृती मेळाव्याचे आयोजन व पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार वितरण २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून नवभारत छात्रालयाची स्थापना करून पुज्य सामंत गुरूजी यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

याचदिवशी पांडुरंग शिंदे गुरूजी यांच्या स्मृती निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दापाली येथे २३ रोजी होणाऱ्या स्मृती मेळाव्याला माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील प्राचार्य डॉ. महेंद्र सुदाम कदम हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्तमान शिक्षण व्यवस्था आणि भविष्य या विषयावर प्रमुख अतिथींचे व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत गीते असणार आहेत. यावेळी दीपप्रज्वलन व गुरूदयांच्या प्रतिमांना पुष्पहार समर्पण, स्वागत व प्रास्ताविक, मान्यवरांचा सत्कार, सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्काराचे वितरण, वार्षिक भरारी अंकाचे प्रकाशन, सत्कारमूर्तींचे मनोगत, सामंत गुरूजी आणि पांडुरंग शिंदे यांचे पुण्यस्मरण, प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन, अध्यक्षांचे मनोगत व आभार प्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व बांधीवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुणबी सेवा संघ दापोली अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर व राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.