वाळू माफियांच्या मदतीसाठी आलेली दोन वाहनेही पसार
कणकवली l चंद्रशेखर तांबट : अवैध वाळू माफियांनी मालवण तालुक्यात धुडघुस घातला असून अवैध वाळूची विनापरवाना वाहतुक करणारे पाच डंपर मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या पथकाने पाठलाग करून रोखले. तेवढ्यात त्यांच्या मदतीसाठी दोन कारमधून आलेल्या सहकाऱ्यांनी दादागिरीची भाषा करीत अंगावर धावून जात पाचही डंपर पळवून नेऊन वाळू माफिया पसार झाले. ही थरारक घटना निरोम (ता.मालवण) ते बिडवाडी (ता.कणकवली) दरम्यान ६ जानेवारी मध्यरात्री १२.३० वा.च्या दरम्यान घडली. याबाबत मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या फिर्यादिनुसार आचरा पोलिसात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपासासाठी हा गुन्हा ‘झिरो’ नंबरने कणकवली पोलिस ठाण्यात आज वर्ग करण्यात आला. पळून जाताना पाचही डंपर मार्गात डंपिंग करून रिकामी केले. अवैध वाळू माफियांच्या विरोधात महसुल प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक माफियांच्या शोधात निघाले होते. हे पथक ओसरगांव, असरोंडी, शिरवंडे, किर्लोस बंधाऱ्यावरून निरोम येथे आले असताना त्यांना कणकवलीच्या दिशेने जाताना डंपर दिसले. तहसिलदार श्री.पाटील यांनी डंपर थांबविण्याचा निर्देश केले परंतु डंपर थांबले नाहीच पण हुलकावणी देत भरधाव वेगात निघून गेले. एकूण पाच डंपर होते. तहसिलदार यांच्या टिमने हे पाचही डंपर पाठलाग करून बिडवाडी येथे अडविले.
डंपर चालकांना पथकाने परवाना आहे का ? वाळू कुठे भरली अशी विचारणा केली. चालकांनी परवाना नसल्याचे सांगून वाळू कालावल खाडी च्या किनारी चिंदर गावच्या तेरये या भागात वाळू डंपरमध्ये भरल्याचे सांगितले. महसुल पथक पंचनाम्याचे काम करीत असताना त्या ठिकाणी एक स्विफ्ट मारूती कार व व्हॅगनआर आली. त्यातून जमावाने आलेल्यांनी महसुल पथकास तुम्ही पंचनामा करू नका असे डरकावुन दादागिरीची भाषा सुरू केली. पथकांच्या अंगार धावून जात पंचनामा करण्यास रोखले व जोरदार हुल्लडबाजी करून पाचही डंपर चालकांनी डंपर घेऊन तिथून पळ काढला. स्विफ्ट कार, व्हॅगनआर चालकांनी कारसह तिथून पळ काढला. जाताना वाटेत वाळू डंपिंग करून डंपर रिकामी केले.
याबाबत मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या फिर्यादिवरून डंपर, स्विफ्ट, व्हॅगनआर कारचे तीन चालकांसह कारमधून जमावाने आलेल्या सर्वांवर शासकीय कामात अडथळा आणने भादवि ३५३, अंगावर धावून जाणे ३५२, १४३ जमावाने येणे, २७९ भरधाव वेगात वाहन चालविणे, ३७९ पंचनामा करण्यास विरोध तसेच ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ अधिक तपास करीत आहे.