कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कणकवली | प्रतिनिधी : स्त्रीमुक्तीपासून मानवमुक्तीचा प्रवाह कवयित्री सरिता पवार यांच्या कवितेत प्रकर्षाने दिसून येतात.आत्मभान जपतानाच समाजभान जपणारी आणि दुःखमुक्त मानवता शोधणारी सरिता पवार यांच्या कविता आहेत.विवेकी विद्रोहाची पेरणी करणारा राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह असून महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा काव्यसंग्रह म्हणून काव्यसंग्रह म्हणून नावारूपाला येईल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या राजगृह प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मिळून साऱ्याजणी च्या संपादिका गीताली. वि.म. यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या उषा परब, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य डॉ. विशाल इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली कॉलेज च्या एच.पी.सी.एल.सभागृहात संपन्न झाले.यावेळी सबनीस बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, राजगृह प्रकाशन चे राजवैभव शोभा रामचंद्र, शुभांगी पवार, , पत्रकार राजन चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग , गोवा तसेच महाराष्ट्रातून साहित्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील रसिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले, सदाशिव पवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पून करण्यात आला. यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की , सरिता पवार यांच्या कविता प्रगल्भ स्त्रीवादी असून सर्व पुरुषविरोधी नाहीत. अभिव्यक्तीचे रिंगण महत्वाचे हे अधोरेखित करताना संकुचित आणि पक्षपाती पुरुषी आदर्शाना धुडकावून स्त्रीत्वाचा आवाज बुलंद करणे महत्वाचे आहे.
रामायणातील राम-लक्ष्मण बंधुप्रेम लोकप्रिय आहेच परंतु सीतेचा त्याग आणि उर्मिलेच्या मनातील विरहाच्या स्पंदनाची दखल भारतीय संस्कृतीने घेतलेली नाही. सरिता पवार यांनी आपल्या कवितांतून सीतेला अग्नीपरिक्षा द्यायला लावणाऱ्या पुरुषी अहंतेचेही प्रतीक असणाऱ्या रामाचे देवत्व नाकारत आजच्या युगात स्त्रीपुरुष समानतेचा धागा गुंफला आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गीताली वि. म.म्हणाल्या की राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहातील कवितांची भाषा सोपी, प्रवाही आणि आशयघन आहे. भाषा आणि संस्कृती यांचे नाळेचं नाते असते. समूहाची संस्कृती भाषेला जिवंत ठेवते. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव, आणि सामाजिक न्यायाचा परिवर्तनशील विचार राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहातून व्यक्त होतो. प्रा. उषा परब म्हणाल्या की अल्पावधीत खूप प्रगल्भ झालेल्या काव्यलेखनाने सरिता पवार यांनी मराठी साहित्यविश्वाला आपली ओळख करून दिली आहे. सरिता पवार यांनी साहित्यविश्वात घेतलेली स्वयंसिद्ध भरारी कौतुकास्पद आहे. डॉ. विशाल इंगोले म्हणाले की समाजात सध्या सामाजिक तेढ वाढत चाललेली असताना माणुसपणाला सोबत घेऊन जाणारी कविता हे सरिता पवार यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे. प्रास्ताविक मांडताना काव्यसंग्रहाचे प्रकाशक राजवैभव म्हणाले की संविधानात्मक लिखाण प्रसिद्धी हा हेतू राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहातुन साध्य झाला आहे. संविधान मूल्ये जोपासणारा हा काव्यसंग्रह आहे. मनोगत व्यक्त करताना कवयित्री सरिता पवार म्हणाल्या की दैनंदिन जीवनातील अनुभव आपसूक कवितारुपात प्रतिबिंबित झाले. स्वतःचे अस्तित्व म्हणजे निजखूण. हीच निजखूण काव्यरूपाने या काव्यसंग्रहात व्यक्त केली आहे. कार्यक्रमाचे अर्थवाही सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले. आभार राजन चव्हाण यांनी मानले.
फोटो कॅप्शन – राखायला हवी निजखूण काव्यसंग्रह प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस, गीताली वि.म., डॉ.विशाल इंगोले, प्रा. उषा परब, राजवैभव, सरिता पवार, शुभांगी पवार, नामानंद मोडक, राजन चव्हाण
बॉक्स
काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांनी व्हाटसअपद्वारे शुभेच्छा देताना मानवतावादी दृष्टिकोनातून होणारी संवादी वाटचाल हा सरिता पवार यांच्या कवितांचा मध्यवर्ती दृष्टिकोन आहे. जनाबाई,बहिणाबाईंपासून ते समकालीन प्रज्ञा पवार, नीरजा ,कविता महाजन पर्यंत च्या कवितांशी सरीताच्या कवितांचे नाते जोडलेले आहे. सामाजिक भान, स्त्रीविषयक मानवतावादी दृष्टिकोन, आशयाला अनुकूल अशी प्रभावी शब्दकळा हे काव्यसंवेदनेला पूरक ठरणारे गुण व्यक्तिमत्वात असल्यामुळेच ते कवितेच्या माध्यमातून प्रकट होतात. कुठल्याही कवीला त्याचा स्वतंत्र आत्मस्वर, त्याची नाममुद्रा, धारण केलेला फक्त आपलाच म्हणता येईल असा स्वर गवसण्यासाठी आकाशातील वीज पकडण्याच्या प्रयत्नात जळून राख होण्याची तयारीला ठेवावी लागते. खास आपली म्हणता येईल अशी एकतरी कविता लिहिता आली तरी कवी असण्याचे सार्थक झालं असे म्हणता येईल. राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहात सरिता पवार टच असलेल्या स्वयंसिद्धा, नदीमाय, विसर्जित होत जातेय विहीर, निवळशंख सारख्या कविता आहेत.