रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील संगीत चळवळीसाठी अमूल्य योगदान देणारे गुरुवर्य कै. बाळासाहेब हिरेमठ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरुवर्य विश्वाराध्य ऊर्फ बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्टस् अॅकॅडमीतर्फे ‘स्वरपुष्पांजली’ मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. ९) सायंकाळी ७ वाजता प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे.प्राचार्य राजशेखर मलुष्टे यांच्या संकल्पनेतून स्वराभिषेक-रत्नागिरीचे शिष्य मराठी गीतांची स्वरपुष्पाजंली अर्पण करणार आहेत. याकरिता प.पू. गगनगिरी महाराज भक्तमंडळाचे राम पानगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
यामध्ये शंतनू पावसकर, अवधूत पंडित, आदित्य दामले, स्वरा लाकडे, वेदिका धुपकर, स्वरा भागवत, मीनल यादव, ऋग्वेदा हळबे, अनया वाडेकर, तन्वी मोरे, शिवानी पवार, सौ. धनश्री दरडी, मीरा सोवनी, सौ. मनीषा झोरे, सौ. अनुष्का मोरे, सौ. राधा केळकर व राकेश बेर्डे हे गायक भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते सादर करणार आहेत. याचे संगीत संयोजन सौ. विनया परब यांचे असून महेश दामले (हार्मोनियम), मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंदार जोशी (बासरी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज) आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) हे संगीतसाथ करणार आहेत. महेंद्र पाटणकर निवेदन करणार असून राकेश बेर्डे ध्वनिसंयोजनाची बाजू सांभाळणार आहेत. हिरेमठ सरांच्या शिष्यवर्गाने तसेच संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिरेमठ अॅकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.