भारत सरकार परमाणू ऊर्जा विभागाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांची बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवलीला सदिच्छा भेट.

Google search engine
Google search engine

कणकवली | प्रतिनिधी : जानवली येथील बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे भारत सरकार च्या परमाणू ऊर्जा विभागाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांनी सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, मुलांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या यशाचे शिखर गाठायचे असेल तर अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक माणसाने आयुष्यात कोणता ना कोणता छंद जोपासला पाहिजे. संगीत, कला क्रिडा, वर्तमानपत्र वाचणे, साहित्य वाचन असे विविध छंद जोपासणे आवश्यक आहेत.

UPSC परीक्षेचे मार्गदर्शन तसेच भाभा अनुसंशोधन केंद्र या व्यतिरिक्त इतर कोणत्या विविध शैक्षणिक संस्थांमधून विदयार्थी उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करू शकतात याचे मार्गदर्शन केले. परमाणु ऊर्जा इतर उर्जांपेक्षा कशी श्रेष्ठ ठरते?, सूक्ष्मजीव शास्त्राच्या आधारे आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते?, आण्विक ऊर्जेचा वापर अंतराळ प्रवासासाठी केला जाऊ शकतो का? अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या कुतूहलात्मक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी या भेटी दरम्यान दिली.

विद्यार्थ्यांसोबत बोलताना त्यांनी त्यांचा सिंधुदुर्गातील पहिल्या आय ए एस ऑफिसर ते भारत सरकार परमाणु विभागातील संयुक्त सचिव पदापर्यंतचा प्रवास कसा घडला याबाबतही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

शिक्षणासारखं चांगल्या हेतूने केलेल्या कामासारखं दुसर काम नाही. चांगल्या शिक्षणामुळे पिढ्यांपिढ्यांचा उद्धार होतो. तुम्ही जे काही कराल ते चांगलं करा, जो विषय निवडाल त्या विषयाबद्दल कुतूहल निर्माण झाले पाहिजे व त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली, या शाळेचा निसर्गरम्य परिसर आणि शाळेतील वातावरण मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी पोषक आहे असे कौतुकही त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित श्री. संतोष तायशेटे (समानवता ट्रस्ट विश्वस्त), विनायक मेस्त्री (सा. कार्यकर्ते), कमलेश गोसावी (समानवता ट्रस्ट सदस्य, कवी, शिक्षक), तसेच अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, शैक्षणिक उत्कृष्टता समन्वय संचालक प्रणाली सावंत, संस्थेचे सदस्य संदीप सावंत, विनायक सापळे, शिक्षक पालक संघटनेचे कल्पेश महाडेश्वर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.