इतर देशातून चीनमध्ये येणाऱ्या नागरिकांवर विलगीकरणात राहण्याचे निर्बंध रद्द

चीन मध्ये कोविड संसर्गाच्या प्रमाणात वाढ दिसून येत असली तरी चीन सरकारनं इतर देशातून चीनमध्ये येणाऱ्या नागरिकांवर विलगीकरणात राहण्याचे लागू केलेले निर्बंध आजपासून रद्द केले आहेत. चीननं अनिवार्य विलगीकरण आणि लॉकडाऊनचे नियम गेल्या महिन्यापासून शिथिल करायला सुरुवात केली होती. कोरोना प्रतिबंधक कठोर नियमांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून येत असल्यानं या विरोधात राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जपाननं चीनमधून येणाऱ्या लोकांसाठी उद्यापासून अधिक कडक निर्बंध लावण्याचं ठरवलं आहे.चीनच्या मुख्य भूमीतून थेट उड्डाणांद्वारे जपानमध्ये येणार्‍या प्रवाशांना चीनमधून प्रवासाला सुरुवात करण्याच्या 72 तासांच्या आधी मिळालेल्या कोविड चाचणीचा पुरावा सादर करावा लागणार आहे.याशिवाय जपानमध्ये उतरल्यानंतर साध्या एंटीजन चाचणीऐवजी प्रवाशांची पीसीआर स्क्रीनिंग चाचणी करण्यात येईल.तसंच संसर्गाची लक्षणं आढळल्यास अशा प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.