निहाली गद्रेच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध!
चिपळूण | प्रतिनिधी : विचारांची देवाणघेवाण करणे , हास्यविनोदात रंगून जाणे , नवनवीन ओळखी होणे , एकमेकांतील स्नेहभाव अधिक दृढ करणे यासाठी दर वर्षी ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण तर्फे सर्व ब्राह्मण ज्ञाती बांधव एकत्र यावेत या साठी “आनंद मेळ्याचे” आयोजन करीत असतो . या वर्षी ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी या मेळ्याचे आयोजन केले होते. आधी संगमेश्वरच्या स्वरनिहालीच्या निहाली गद्रे हिच्या गाण्याची मैफिल आणि मग गुळपोळीसह भोगीच्या सहभोजानाचे आयोजन केले गेले होते. उपस्थित रसिकांचे गायनाने आधी कान तृप्त झाले आणि नंतर गुळपोळीने रसना तृप्त झाली . या मेळ्यात खऱ्या अर्थाने आनंदाची देवाणघेवाण संपन्न झाली .
संगमेश्वरची उदयोन्मुख गायिका निहाली अभय गद्रे हिच्या संगीत मैफिलीचे यावर्षी या आनंदमेळ्यात आयोजन करण्यात आले होते. निहालीची आई सौ. दीप्ती अभय गद्रे यांनी निवेदनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली तर , चिपळूण मधील प्रथमेश देवधर यांनी तबला साथ केली. चिपळूण मधीलच एक उत्तम गायक आणि संवादिनी वादक वरद केळकर यांनी संवादिनी साथ केली. सकपाळ आणि नाचणकर यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली.
संघाच्या पदाधिकारी आणि कलाकारांनी श्रीदेव विरेश्वराचे आशीर्वाद घेतल्या नंतर कार्यवाह यांनी सर्वांचे स्वागत केले आणि कलाकारांचे स्वागत सौ. शीला केतकर, मुकुंद कानडे, अवि पोंक्षे मधुकर जोशी यानी केले . कलाकारांचा परिचय सौ.शीला केतकर यांनी करून दिल्यावर मैफिलीला सुरुवात झाली.
तू सुखकर्ता या गणेश वंदनाने सुरुवात झाल्यावर विष्णुमय जग,अबीर गुलाल, बाजे मुरलिया,मी राधिका आणि आणखी काही गाणी कु. निहालीने अप्रतिम अशी गायली. निहालीच्या आईचे निवेदन उत्तम आणि मोजके होते . त्यांच्या निवेदनातून आईचे हळुवार प्रेम दिसत होते. एक दोन गाण्या नंतर निहालीने सभागृहाचा ताबाच घेतला आणि मग तिची मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली . त्यांच्या गाण्याची निवड छान होती सगळी गाणी श्रोत्यांच्या माहितीची आणि आवडीची होती. कितीतरी श्रोते निहाली बरोबर गात होते आणि प्रत्येक गाण्याला दाद देत होते. सगळे सभागृह तुडुंब भरले होतेच शिवाय सभागृहाबाहेरही उभे राहून गान प्रेमी गायनाचा आस्वाद घेत होते.मैफिल पूर्ण होईपर्यंत कोणीही जागचे हलले नाही.
कानडा राजा पंढरीचा या गाण्याच्या अखेरीस निहालीने विठू नामाचा गजर सुरु केला त्यात सगळे सभागृह टाळ्या वाजवीत तल्लीन होऊन सामील झाले.ही जणू निहालीच्या गायनाला श्रोत्यांनी दिलेली पावतीच होती. मैफिली नंतर कितीतरी लोकांनी आवर्जून तिची भेट घेउन दाद दिली कु. निहालेची आई दिप्ती आणि वडिल अभय गद्रे सोबत होतेच त्यांनाही आपल्या मुलीचे कौतुक पाहून खूप समाधान आणि आनंद झाला .मैफिल यशस्वी होण्यात जितके श्रेय निहालीचे आहे तितकेच ते वरद आणि प्रथमेश यांचेही आहे हे दोघे आता अनुभवी कलाकार आहेत. त्या दोघांनी निहालीला साथ देत तिचा आत्मविश्वास वाढविला ते दोघेही याचा आनंद घेत होते हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हिते. भैरवी पूर्वी सर्व कलाकार आणि ध्वनि संयोजकांचा संघातर्फे अविनाश पोंक्षे यांनी सन्मान केला आणि केतकर यांनी सर्वां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मैफिली नंतर लगेच सहभोजन सुरु झाले . तुपासह गुळपोळी कढी खिचडी पापड मिश्र भाजी भाकरी आणि संचालिका सौ. उषा खरे वाहिनी यांनी केलेला ठेचा याचा आस्वाद सर्वांनी घेतला. कार्यक्रम संपून घरी जाताना आलेल्या लोकांनी सगळा कार्यक्रम अतिशय छान झाल्याचे भेटून सांगितले आणि तृप्त मनाने घरी परतले. संघाचे सर्व संचालक आणि संघाचा सर्व महिला विभाग यांनी मनापासून प्रयत्न करून एक चांगला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविला याचे समाधान सर्वाना मिळाले.