विद्यार्थी दशेत ध्येय निश्चीत करुन स्पर्धा परिक्षांची तयारी करावी – शौर्यचक्र विजेते मधुसुदन सुर्वे

Google search engine
Google search engine

संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून मंडणगड येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न.

मंडणगड | प्रतिनिधी : विद्यार्थी दशेत ध्येय निश्चीत करुन स्पर्धा परिक्षांची तयारी करावी. एम.पी.एस.सी यु.पी.एस.सी. व्दारे सनदी सेवेमध्ये अधिकारी होण्याबरोबरच आर्मी, पोलीस, नेव्ही, एअरफोर्स आदी अनेक क्षेत्रात विद्यार्थी आपले करियर घडवू शकत असल्याने बदलत्या काळात मोबाईलचे संस्कृतीचा अंगीकार करण्यापेक्षा विरांच्या गाथांपासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परिक्षांची तयारी करण्याची आवश्यकता भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते निवृत्त पँराकमांड़र मधुसुदन सुर्वे यांनी व्यक्त केली. 7जानेवारी 2023 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संवेदना फाऊंडेशनचेवतीने आय़ोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमास निवृत्त सुभेदार सतिष सुर्वे, लेप्टनंट कर्नल संतोष मोरे, माजी पोलीस आयुक्त रमेश घडवले संवेदना फाऊंडशनचे अध्यक्ष विनोद चाळके, विश्वास पवार, पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, नायब तहसिलदार संजय भिसे, मुंबई महापालिक अधिकारी शुभोधन जाधव, उपप्राचार्य वाल्मिकी परहर, विश्वदास लोखंड़े, राजेश गमरे, उपप्राचार्य अर्जुन हुल्लोळे, मनोज मर्चंडे, अभिजीत पालवे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना श्री. मधुसूदन सुर्वे पुढे म्हणाले की देशातील सैनिकांच्या शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात असण्याची आवश्यकता आहे. करियर निवडताना आपल्या काय करावयाचे आहे हे ठरवण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते, त्यामुळे मोठा विचार करा, उच्च ध्येयपुर्तीकरिता माणूस मोटीव्हेट होणे गरजेचे असते त्यासाठी खऱ्या ज्ञानाची कास धरा. मोबाईलचां वापर चांगल्या कामासाठी व माहीती मिळवण्यासाठी करा, नेते महापुरुष यांच्या चरित्र्याचा अभ्यास स्वतःस प्रेरीत कऱण्यासाठी करा. यावेळी बोलताना लेप्टनंट कर्नल संतोष मोरे म्हणाले की, जीवनात कोणत्याही क्षेत्रात वावरताना माणासमध्ये सकारात्मकता असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असताना महापुरुषांचे आदर्श घेत सकारात्मकता अंगीकारावी. शिबारास उपस्थिती विद्यार्थ्यांना सुभेदार सतिष सुर्वे, शैलजा सांवत, रमेश घडवले यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिबारास शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवेदना फाऊडेशनच्या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतूक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवेदना फाऊंडनेचे सर्व सभासदांनी मेहनत घेतली.
फोटो ओळी- संवेदना फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करताना शौर्यचक्र विजेते मधुसुदन सुर्वे, कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसमवेत दिसत आहेत.