पालकांनी पाल्यांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे- अण्णा सामंत

Google search engine
Google search engine

रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे उद्घाटन

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे (वर्ष दुसरे) उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अण्णांनी सांगितले की, आपल्या आयुष्यातला सेकंद वाया गेला तर तो परत मिळत नाही. आपण कोणतेही कार्य करताना मुहूर्त बघतो. त्यामुळे वक्तशीरपणा हवाच. आजचे हे संमेलन खूपच कौतुकास्पद आहे. फक्त अभ्यासाकडे लक्ष न देता पालकांनीही मुलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात रविवारी दिवसभर सायकल संमेलन उत्साहात झाले. उद्घाटनानंतर अण्णा बोलत होते.

टीआरपी येथील अंबर हॉल येथे या संमेलनाचे आयोजन केले होते. उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर दर्शन जाधव, तृणाल येरूणकर, मिलिंद खानविलकर, डॉ. स्वप्नील दाभोळकर आणि प्रीतम पाटणे उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, दापोली, चिपळूण आणि खेड सायकलिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन यशस्वी झाले. संमेलनात सुमारे दोनशेहून अधिक सायकलप्रेमी, सायकलपटू, नागरिक सहभागी झाले.

जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल याकडे लक्ष देऊया. खेड, चिपळूण, दापेली, रत्नागिरीत क्लब आहेत आता लांजा, संगमेश्वर, राजापूर येथेही क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा. कोकणात सायकलिंग कॅपिटल व्हावी. संमेलनाला येताना सर्वांनी सायकलवरून यावे. म्हणजे प्रशासनाला चांगले रस्ते केले पाहिजेत हे लक्षात येईल. या वर्षात प्रत्येकाने स्वतःसोबत एक तरी सायकलिस्ट घडवा, असे आवाहन महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांनी केले.

सायकल पालखीने मने जिंकली
कोकणात शिमगोत्सवात ज्या पारंपरिक उत्साहात, वाद्यांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक काढतात त्याच उत्साहात आज ढोल-ताशांचा गजर करत सायकल देवतेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत लहान सायकल विराजमान झाली होती. निमित्त होते रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे. सायकलची ही आगळीवेगळी पालखी नाचवण्यासाठी सायकलप्रेमींची गर्दी झाली. हा नावीन्यपूर्ण प्रयोग यंदा प्रथमच करण्यात आला. त्यानंतर धुपाटणे फिरवून आणि घंटानाद करून गाऱ्हाणेसुद्धा घालण्यात आले.