कोण आहेत या पुरस्काराच्या मानकरी?
नवी दिल्ली : आपल्या देशातील, समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करणार्या तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाविषयी प्रचार करत जगाला शांततेची शिकवण देणार्या एका व्यक्तीला अथवा संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार (Nobel peace prize) दिला जातो. यंदा हा पुरस्कार इराणमधील (Iran) महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढा देणार्या आणि मानवाधिकारांसाठी काम करणार्या नर्गिस मोहम्मदी (Narges Mohammadi) यांना जाहीर करण्यात आला आहे. ५१ वर्षीय नर्गिस यांना मिळणार्या या पुरस्काराचे स्वरुप एक मेडल आणि सुमारे ८.३३ कोटी रुपये असं आहे.
नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात १० वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. नर्गिस या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर (Defender of Human Right centre) या संस्थेच्या उपप्रमुख आहेत. २००३ सालच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी या संस्थेची स्थापना केली होती.
गेल्या ३० वर्षात नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात हालचालींबद्दल सरकारने अनेकदा शिक्षा केली आहे. माहितीनुसार, न्यायव्यवस्थेने मोहम्मदींना पाच वेळा दोषी ठरवले आहे आणि १३ वेळा अटक केली आहे. नर्गिस यांनी व्हाइट टॉर्चर नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगातील आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा लिहिल्या आहेत.