NCP: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

मुंबई: ऱाष्ट्रवादी पक्षाचे(NCP) चिन्ह तसेच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आज पार पडली. या बाबतची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यावेळी उपस्थित होते. या सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाने खोटी कागदपत्रे दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावाही सिंघवी यांनी केलाय.

शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या. तर अजित पवार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आले होते. निवडणूक आयोगात ही सुनावणी दोन तास चालली. पहिल्या भागाची सुनावणी एक तास होती. एनसीपीचे अधिकार आणि पक्ष चिन्ह याबाबत सोमवारी निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगात गेले प्रकरण

अजित पवार यांनी ३० जूनला निवडणूक आयोगात पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. पुढील सुनावणीला म्हणजेच ९ ऑक्टोबरला अजित पवार गट आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडतील. नुकतेच काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की काही लोक स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता वेगळे झाले आहेत.