रत्नागिरी : नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आयोजित स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये हर्षद घडशी (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी) आणि शार्दुल शेलार (न्यू इंग्लिश स्कूल कसबा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरवर्षी ही परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने ही परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. यावर्षी या परीक्षेचे हे पाचवे वर्ष. दरवर्षी या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असतो. कोरोना काळातही या परीक्षेला ऑनलाईन माध्यमातून उदंड प्रतिसाद मिळाला. लांजा, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठी मोठा सहभाग असतो. प्राथमिक फेरीसाठी यावर्षी 30 शाळेतील 1600 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यातून अंतिम फेरीसाठी 135 विद्यार्थी पात्र ठरले.
यातून हर्षद घडशी (दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी) आणि शार्दुल शेलार (न्यू इंग्लिश स्कूल, कसबा) यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. कौस्तुभ हर्डीकर (शिर्के हायस्कूल) आणि शिवम बेंद्रे (नवनिर्माण हाय) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर भूषण बावधनकर (नॅशनल इंग्लिश स्कूल राजापूर) याने तृतीय क्रमांक पटकावला.
रितेश गुरव (दादासाहेब सरफरे विद्यालय), पार्थ सकपाळ ( हर्चे विद्यालय) अंकुर साठे ( शिर्के हायस्कुल), तनुजा पाचकुडे (करबुडे हायस्कूल), रेणुका मेलगे (जागुष्ट्ये हायस्कूल) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, ज्यू.कॉलेज विभाग प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रा. शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित यादव यांनी मानले.