कणकवली व वैभववाडीतील सरपंचाचा सहभाग
वैभववाडी l प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नव्याने थेट निवडून आलेल्या सरपंचांचे पायाभूत प्रशिक्षण मत्स्य महाविद्यालय शिरगाव जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पार पडले. चार दिवसीय निवासी प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे (यशदा) यांच्यामार्फत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणला कणकवली व वैभववाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते. प्रशिक्षण मध्ये सत्र समन्वयक म्हणून एन. टी. देसले यांनी काम पाहिले.
या प्रशिक्षणमध्ये नेतृत्व विकासाची दुरदृष्टी, सरपंच पदाचे अधिकार व जबाबदारी, विविध शासकीय योजना यांची माहिती, गावाचा भूगोल व पर्यावरण संतुलनाच्या अनुषंगाने सरपंचांची भूमिका, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, माजी वसुंधरा अभियान, आर. आर. पाटील सुंदर गाव योजना, राष्ट्रीय पंचायत बक्षीस योजना, जन्मोक्त शिवार अभियान याबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, दलित वस्ती सुधारणा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर केंद्र, राज्य शासनाच्या योजना बाबत माहिती देण्यात आली.
स्वच्छ व हरित गाव जलसमृद्ध व पायाभूत सुविधायुक्त गाव, खरेदी प्रक्रिया, ई-टेंडरिंग, पोर्टल, व्यक्तिमत्व विकास संभाषण, कौशल्य नेतृत्व गुण व व्यक्ति विकासातून सामाजिक विकास, गावामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम महत्त्वाचे कलमे व ग्रामपंचायत दप्तर 1 ते 33 नमुने, शाश्वत विकासाची ध्येये, ग्रामपंचायत अंदाजपत्रक, ग्रामपंचायत उत्पन्न वाढवण्यासाठी करायचा उपाय योजना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच कोतवडे येथील ग्रामपंचायतला भेट देऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी करण्यात आली. आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात आली. जीपीडीपी कृती आराखडा, 15 वित्त आयोग व इतर योजनांची माहिती देण्यात आली. गाव दारिद्र मुक्त आराखडा व बचत गट या बाबत माहिती देण्यात आली. शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टे व 9 थीम यांची पुरेपूर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी प्रवीण प्रशिक्षक म्हणून सौ हर्षदा वाळके, श्री दत्ता गुरव, श्री विक्रम खोपडे, प्रा. नारायण परब, शुभांगी कोलगे, सौ चैत्राली शेलार, डॉ. केतन चौधरी मत्स्य महाविद्यालय विभाग प्रमुख, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चार दिवस चाललेल्या प्रशिक्षणाबाबत उपस्थित सरपंचांनी विविध प्रश्न विचारत माहिती जाणून घेतली. तसेच या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सत्र समन्वयक श्री एन. टी. देसले, श्री प्रतीक कुलकर्णी व मत्स्य महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.











