दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक क्षेत्रात काम करणारे हर्णै-पाज मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विष्णू पावसे यांची भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. विष्णू पावसे यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि धार्मिक क्षेत्रात काम केले आहे. पाजपंढरी ग्रामपंचायतीचे ते पहिले म.गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच कारकीर्दीत पाजपंढरी ग्रामपंचायतीला तंटामुक्त ग्रामपंचायतीचा सात लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या दरम्यान कणेरी कोल्हापूर मठाचे मठाधिपती परमपूजनीय अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दापोली तालुक्यात सामाजिक कार्यात सेवा गुरुकुल मंडळ पाजपंढरीच्या माध्यमातून जनसेवा केली होती.
विष्णू पावसे यांची भाजपा मच्छिमार सेल जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ते मासेमारी क्षेत्रात देखील चांगल्या पद्धतीने जनसेवा करतील अशी मच्छीमारांना अपेक्षा आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.