बांदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला १० हजाराहून अधिक हिंदूंची उपस्थिती
बांदा : ‘ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हाल सोसूनही हिंदु धर्म सोडला नाही, त्यांना ‘धर्मवीर’ म्हणू नका’ , असे अजित पवार म्हणतात. छगन भुजबळ श्री सरस्वती देवीवर टीका करतात. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातो. या सर्वांना आता लोकशाहीच्या मार्गाने घरी बसवण्याची वेळ आली आहे. हिंदु धर्मासमोर लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड कायदा, धर्मांतर अशी अनेक संकटे आहेत. गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण देशच गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. कुडाळ तालुक्यात पावशी येथे डोंगरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू झाला होता. याविषयी प्रबोधन केल्यानंतर जागृत झालेल्या स्थानिक हिंदूने विरोध केल्यानंतर हा प्रकार बंद झाला. अशा प्रकारे धर्मविरोधी कृत्यांच्या विरोधात चालू असलेल्या या लढ्यात सहभागी व्हा ! असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा अन् गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
बांदा शहरातील खेमराज हायस्कूलच्या पटांगणात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या प्रारंभी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते आणि समितीचे समन्वयक श्री. मनोज खाडये व हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून सभेचा प्रारंभ झाला.
या वेळी सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘देशात सर्वांना समानतेची शिकवण देणारी राज्यघटना हिंदूंना मात्र वेगळी वागणूक देत आहे. विश्वात सर्वत्र बहुसंख्यांकांचा धर्म, रिलिजन किंवा मजहब यांना कायद्याचा महत्त्वपूर्ण स्रोत मानले गेले आहे. कायदे बनवतांना तेथील बहुसंख्यांकांच्या धर्मपरंपरांचा आधार घेतला जातो. भारतात कुणीही उठतो आणि प्राचीन हिंदु प्रथांना थेट सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देतो. हिंदु धर्माला राजकीय संरक्षण नसल्यानेच ही विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे. बहुसंख्यांक हिंदूंच्या विकासासाठी मात्र ‘बहुसंख्यांक विकास मंत्रालय’ नाही ! संविधानाद्वारेच केला जाणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ? जर नसेल, तर हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद केला पाहिजे.’’असे त्या म्हणाल्या.
तर अधिवक्ता नीलेश सांगोलकर बोलताना म्हणाले की, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करतांना हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची योग्य माहिती घेऊन तिचा वापर करणे आवश्यक आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मागे अधिवक्त्याचे बळ असेल, तर कार्य करणे सोपे होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्यासाठी बळ देणे हे हिंदु अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. या सभेला पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची उपस्थिती लाभली. धर्मरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सुशांत जनार्दन भागवत, गोविंद गोवेकर आणि बांदा येथील श्री. आशुतोष भांगले या धर्मप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवली. सभेचे प्रास्ताविक सत्यविजय नाईक यांनी तर सूत्रसंचालन व आभार विपुल भोपळे यांनी मानले.