कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत मेढा निवती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामवाडी येथे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच श्री. अवधूत रेगे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ग्रामसंघ अध्यक्ष श्रीम.रचना सारंग, सीआरपी श्रीम.प्रिया कांदळगावकर , कोकण संस्थेचे समन्वयक श्री. समिर शिर्के, प्रशिक्षक श्रीम. स्मिता प्रभू व गावातील महिला उपस्थित होत्या. कोकण संस्थेच्या वतीने मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्री. समीर शिर्के यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले.सरपंच श्री. अवधूत रेगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, व्यावसायिक माहिती दिली व कोकण संस्थेच्या उपक्रमांविषयी गौरवोद्गार काढले. हे प्रशिक्षण पुढील २ महिने सुरू राहणार असून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच यांनी केले.












