सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत अखेर ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ ‘ रुजू

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत गेले काही महिने रिक्त असणाऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत गोविंद भारत श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी याबाबतचे निर्देश त्यांना दिले असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. रक्तपेढी तसेच सिकल सेल कार्यक्रमांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे कामकाज सुध्दा ते पाहणार आहेत. त्यामुळे रक्तपेढीची व्यवस्था असूनही रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी वणवण देखील थांबणार आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्तपेढी अधिकारी मेडीकल लिव्हवर असल्याने तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त असल्याने ‘कंत्राटी ‘ लोकांच्या जीवावर ब्लड बँकेचा कारभार गेले काही महिने चालू होता. केवळ एक महिला अधिकार हा कारभार पाहत असल्याने इतर व्यवस्थेवर ताण येत होता. तेथील सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून हा ताण दिसत असल्याने व ब्लड बँक बंद होण्याच्या मार्गावर होती.

याबाबत आक्रमक पवित्रा घेत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी शासनाचं लक्ष वेधले होते. सात दिवसांत रिक्त पद न भरली गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला होता. तर उपसंचालक डॉ. भिमसेन कांबळे यांच्याशी राजू मसुरकर यांनी संवाद साधत गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती.

दरम्यान, स्थानिक आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याची दखल घेत संबंधितांना रिक्त पद तातडीनं भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत गोविंद भारत श्रीरामे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( सिकल सेल जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग) यांना ७ ऑक्टोबर पासून पुढील आदेश होईपर्यंत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी याबाबतचे आदेश त्यांना दिले असून गोविंद भारत श्रीरामे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे दोन रक्तपेढी तंत्रज्ञ मंजूर पदांपैकी दोन्ही पद भरली गेली आहेत.

यातील रक्तपेढी तंत्रज्ञ गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने सध्या दिर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. त्यामुळे रक्तपेढी कामकाज २४ तास सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी देखील रक्तपेढी तंत्रज्ञ यांची नियुक्ती अथवा प्रतिनियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. रक्तपेढी तसेच सिकल सेल कार्यक्रमांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे कामकाज सुध्दा श्रीरामे पाहणार आहेत.

या नियुक्तीमुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे रक्तासाठी होणारे हाल व वणवण थांबणार आहे. रक्तपेढीतील उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येणारा ताण देखील कमी होणार असून याबद्दल मंत्री आ. दीपक केसरकर, उपसंचाल डॉ. भिमसेन कांबळे, डॉ. सुबोध इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आभार मानले आहेत. तर युवा रक्तदाता संघटनेकडून होणार आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती देव्या सुर्याजी यांनी दिली आहे.