स्लिपरकोच बसचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

 

६ स्लीपरकोच बसची बांदा -मुंबई, बोरिवली, लातुर मार्गावर मिळणार सेवा

कणकवली : सिंधुदुर्गात सध्या नव्याने सुरू झालेल्या एस.टी. बसमधील शयनयान बसचे लोकार्पण आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते कणकवली आगारात करण्यात आले. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, शहरअध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, संतोष पुजारे, समीर प्रभुगावकर तसेच एस.टी.चे विभागीय नियंत्रक अभिजीत पाटील व एस.टी.चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. नितेश राणे यांनी फीत कापून शयनयान बसचे लोकार्पण केले. तसेच कणकवली आगारातील बांदा ते लातूर च्या दिशेने निघालेल्या बसला आ. नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या. तसेच या बसचा जास्तीत-जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखिल केले.

राज्यातील प्रवासांची जीवनवाहीनी म्हणून लालपरीची ओळख आहे. सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडुन अमृत महोत्सव वर्ष साजरे केले जात आहे. सडक मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित सेवा म्हणून एस.टी.ची सेवा मानली जाते. विविध प्रकारच्या बसेसची सेवा सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ देत आहे. यात आता भर पडलीय ती ‘नविन नॉन एसी स्लीपर कोच’ बसची.

महाराष्ट्र राज्यात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्याच सहा ‘BS 6’ अत्याधुनिक अशा ६ बसेस प्राप्त झाल्या आहेत. बांदा-मुंबई, बांदा-बोरिवली, बांदा-लातूर या तीन मार्गावर या बस गाड्या धावणार आहेत. या बसेसची निर्मिती बसच्या दापोडी येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे. तर सदर बसमध्ये ३० शयनयान यांची निर्मिती करण्यात आली आहे.

अशी आहे बसमधील व्यवस्था
प्रत्येक प्रवाशाला फॅन, रिडिंग लाईट, झोपण्यासाठी गादी-उशी, स्वतंत्र खिडकी, मोबाईल चार्जर, सामान ठेवण्यासाठी जागा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. तर या बसमधून ३० जणांना आरामदायी व सुखकर प्रवास करता येणार असल्याची माहिती वाहतुक नियंत्रक श्री. पाटील यांनी दिली. तर सदर बस नॉन एसी स्लीपर बस असल्यामुळे या बसची सेवा ही रात्रीच्या प्रवासासाठी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

एस.टी. बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. एस.टी महामंडाळाच्या ताफ्यात सध्या शिवशाही, शिवनेरी, शिवाई, अश्र्वमेघ, हिरकणी व विठाई अशा विविध प्रकारच्या बसेसचा समावेश आहे. पण रात्रीच्यावेळी लांब पल्ल्याचा प्रवास करताना शयनयान बस प्रवाशांना सोयीची ठरते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांकडुन शयनयान बसला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच खाजगी ट्रॅव्हल्सच्या शयनयान बसला नेहमी गर्दी असते. त्यामुळे नागरिकांकडुन एस.टी.ने देखिल शयनयान बस सुरू करण्याची मागणी केली जात होती. काही महिन्यांपूर्वी एस.टी. महामंडाळाने शयनयान बसची बांधणी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्याच्या दापोडी येथील कार्यशाळेत ५० स्लीपर बस बनविण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर राज्यात प्रथम सहा बस मिळविण्यास सिंधुदुर्ग जिल्हा मानकरी ठरला.

सदरील शयनयान बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांमधून देखील तेवढाच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच विशेष म्हणजे या बसमध्ये शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती मिळणार असणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अलिकडेच रेल्वेच्या झालेल्या खेळखंडोबामध्ये रेल्वे प्रवाशांच्या मदतीला हिच शयनयान बस धावल्याने ती प्रवाशांच्या अधिक पसंतीस पडली आहे.