जेरुसलम– हमास संघटनेनंतर आता लेबनॉनने इस्त्राइलवर हल्ला सुरु केला आहे. माहितीनुसार सीमेवर रॉकेट डागण्यात आले आहेत. हमाससोबत संघर्ष सुरु असताना लेबनॉनने हल्ला सुरु केल्याने इस्त्राइलची चिंता वाढली आहे. असे असले तरी इस्त्राइलने लेबनॉनवर प्रतिहल्ला सुरु केला आहे. टाईम्स ऑफ इस्त्राइलने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
लेबनॉनच्या हेझबुल्ला दहशतवादी गटाकडून डझनभर रॉकेट आणि शेल्स इस्त्राइलच्या वादग्रस्त भागावर सोडण्यात आले आहेत. गोलन हाईटमध्ये हा हल्ला झाल्यासं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गाझा पट्टी आणि गोलन हाईट येथे इस्त्राइली सैनिकांना लढा द्यावा लागत आहे. (Israel Hamas war Israel says rockets fired from Lebanon Hezbollah militant group fired dozens of rockets)
इस्त्राइलने शनिवारी स्टेट ऑफ वॉर घोषित केले आहे. त्यानंतर हमास आणि इस्त्राइलमध्ये युद्ध पेटले आहे. अनेक रॉकेट दोन्ही बाजूने डागले जात आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत संघर्षात ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजारपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इस्त्राइलमधून समोर येणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमधून तेथील परिस्थितीचे विदारक स्वरुप दिसून येत आहे. विध्वंस झालेल्या भागातून नागरिक हताशपणे फिरत आहेत. अचानक कोठेही रॉकेट हल्ला होत आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. अनेकांना बेघर व्हायला लागलं आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. हमासने ऑपरेशन अल-अक्सा फ्लूड लाँच केले असून त्याअंतर्गत अनेक रॉकेट डागण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्यात येत आहे. दुसरीकडे इस्त्रायलने विरोधी हल्ला सुरु केला आहे. इस्त्राइलने ऑपरेशन आयर्न सॉर्ड लाँच केले आहे. हमासकडून अनेक नागरिकांचे अपघरण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय