कोकणाच्या विकासाकडे राज्य शासनाचे विशेष लक्ष- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यालयाचे मंडणगड येथे उद्घाटन

मंडणगड | प्रतिनिधी : शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राज्य शासनाचे कोकणच्या विकासावर विशेष लक्ष असल्याचे व विकासाचा अनुशेष गतीने भरुन काढणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडणगड येथे केले. न्यायालयाच्या उद्घाटनाकरिता मंडणगड येथे आलेले असताना भिंगळोली येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडणगड तालुका कार्यालयाचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, श्रीराम इदाते, दापोली तालुका अध्यक्ष संजय सावंत, मंडणगड तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, सचिन थोरे, अशोक गोविलकर, गिरीश जोशी, दादा कोकाटे, उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या तत्वाने भारतीय जनता पक्ष लोकसभा महाविजय 2024 करिता सज्ज झाला आहे. देशाच्या विकासात हा काळ स्वर्णीम काळ ठरणार आहे. विकासाचा रथ पुढे नेत असताना कोकणच्या विकासावर शिंदे सरकारने विशेष लक्ष दिले. येथे पायाभुत सुविधाच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मीतीस चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नात मंडणगडमध्ये नवे न्यायालय सुरु केले असून तालुक्याचे विविध समस्या प्रश्नावर पार्टीच्या माध्यमातून नजीकच्या काळात निश्चीतच उत्तरे शोधली जातील.

कार्यालय सुरु केल्याबद्दल तालुका जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कौतूक करताना पार्टीचे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांकरिता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काची जागा आहे येथे सामान्यांच्या सर्व प्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्रीत प्रयत्न करुया. अतिशय विश्वासाचे ठिकाण म्हणून मंडणगडचे कार्यालय नावारुपास येईल लोकांचा विश्वास कार्यालयावर बसेल. महायुतीचे सरकार विकासाच्या विविध योजना आंमलात आणत आहोत. आपल्या सरकारच्या अजेंड्यावर कोकणचा विकास आहे त्यामुळे येत्या काळात कोकणात मोठा झालेला आपणास पहावयास मिळेल. कोकणातील समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. शासनाच्या विविध योजना व प्रकल्प आपणास साकारलेल्या दिसतील. कार्यक्रमास दापोली खेड व मंडणगड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.