सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाट पायथ्याच्या पारपोली गावात २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वन विभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत. त्यामुळे सुमारे १८० प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात. यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य जाती ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या गावात आढळून येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या महोत्सवात तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.
आंबोलीच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल व दरी खोऱ्यातील विविध दुर्मीळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. फुलपाखरांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला यांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळेल. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या फुलपाखरू महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी वन विभाग, पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पारपोली ग्रामपंचायतीने केले आहे.