मुख्यमंत्र्यांचेही लक्ष वेधणार आम. नितेश राणे
सिंधुनगरी | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवेतून कमी केलेल्या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, एकाही आरोग्य सेविकेवर अन्याय होऊ देणार नाही,असे आस्वासन दिल्याने व आमदार नितेश राणे यांनी याबाबत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधु असे आस्वासन दिल्याने गेले १५ दिवस सुरु असलेले जिल्हा परिषद समोरील ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित केले.
जिल्हा परिषद समोर अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांचे गेले १५ दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्यांना सेवेत पुन्हा घेण्याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय झाला नसल्याने त्यानी १० जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचे जाहिर केले होते.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १२ वर्ष काम करत असलेल्या जिल्ह्यातील १९ आरोग्य सेविकांना शासनाच्या परिपत्रका नुसार ३१ ऑक्टोबर २०२२ पासून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत आपल्याला पुन्हा सेवेत दाखल करून घ्यावे. या मागणीसाठी जिल्ह्यातील अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी २१ डिसेंबर पासून जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन सुरु ठेवले होते.
आंदोलनाला १५ दिवस झाले तरीही शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत आमदार नितेश राणे यांनी दखल घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधले असता त्यानी आपण केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य न्याय दिला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही आरोग्य कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. असे आस्वासन अन्याय ग्रस्त आरोग्य सेविकाना दिले असल्याने त्यानी आज आपले गेले १५ दिवस सुरु असलेले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. यावेळी आरोग्य सेविका अर्चना गंगावणे, संपूर्णा सातार्डेकर, सायली जाधव, श्वेता ठाकूर, सरिता जंगले, पूजा परब, सोनाली मोहिते, अनिता जंगम, अंकिता तेली, आदी आरोग्यसेविका उपस्थित होत्या.