सावतंवाडी । प्रतिनिधी : कलबिस्त इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक अभिजित वसंत जाधव यांना मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांना अटक करून सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. रविवारी मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधिताविरोधात मारहाण व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कलबिस्त हायस्कुलचे अतिरिक्त ठरलेले शिक्षक राजेश पाटकर यांच्या बेपत्ता प्रकरणानंतर संतप्त पाटकर यांच्या कुटुंबियांसह अन्य काही जणांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक जाधव यांना जाब विचारला होता. यावेळी शाब्दिक चकमक होत धक्काबुक्की ही झाली होती. यानंतर याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात मारहाण, सरकारी कामात अडथळा तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर यातील सात संशयितांना अटक करून जिल्हा न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले. यावेळी त्यांची रवांनगी न्यायालयिन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, न्यायालय कोठडीत रवानगी झाल्यानंतर संशयितांनी जमिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे.