डॉन्टस कुटुंबीयांचे आमदार नितेश राणेंकडून सांत्वन
सावंतवाडी । प्रतिनिधी : कॅथॉलिक तसेच सैनिक पतसंस्थेचे चेअरमन सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे शनिवारी रात्री निधन झाले. या पार्श्वभूमीवर कणकवली मतदारसंघाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कोलगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत डाँटस कुटुंबीयांचे सांत्वन केले. पी. एफ. डाँन्टस यांचे सहकारातील कार्य हे आमच्यासाठी आदर्शवत आहे व नेहमीच राहील. सहकारातील ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. यापुढेही त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करू, अशी भावना यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.