३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त; संंगमेश्वर पोलीसांची कारवाई
संंगमेश्वर- चोरट्या पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांच्या संगमेश्वर पोलिसांनी सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये कसबा शास्त्रीपूल येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत संंगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा शास्त्रीपूल येथे चरसची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळताच संंगमेश्वरचे पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी कसबा शास्त्रीपूल येथे सापळा रचून ४ आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. अजय राजेंद्र काणेकर (वय-३८), अक्षरा अजय काणेकर (३६, दोघे रा. असगोली, मधलीवाडी, ता. गुहागर), मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी (५६, रा. कसबा शास्त्रीपूल ता. संगमेश्वर), कामील हसन मुल्ला (४८, रा. डिंगणी, मोहल्ला ता. संगमेश्वर) अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून त्यांचेकडून ३,००,०००/- किंमतीचा चरस जप्त करण्यात आला. या कारवाईत ४० हजारांची दुचाकीही जप्त केली आहे.
या चौघांवर संगमेश्वर पोलिस स्थानकात अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भारतीय दंड विधान कायदा ३४ अन्वये दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांनी केली आहे.