होऊ दे चर्चा कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या बद्दल वापरले अपशब्द

शिवसेना शिंदे गटाकडून लांजा येथे वक्तव्याचा जाहीर निषेध

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील सापुचेतळे येथे आयोजित होऊ दे चर्चा या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आमदार राजन साळवी यांचा आज मंगळवारी शिवसेना शिंदे गटाकडून १० ऑक्टोबर रोजी लांजा येथे जाहीर निषेध करण्यात आला.

दरम्यान आता घोडा मैदान लांब नाही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाला पाणी पाजेल आणि मातीत गाडील हे जनताच दाखवून देईल ,असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी आमदार राजन साळवी यांना दिले आहे.
तालुक्यातील सापुचेतळे येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते .या प्रकरणी आज मंगळवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लांजा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माहिती देताना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई तसेच येथील पालकमंत्री यांचे कट्टर समर्थक शंकर गोरे यांनी सांगितले की, होऊ दे चर्चा या कार्यक्रमात विकासावर चर्चा करत असताना आमदार राजन साळवी यांनी आपण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला. खानवली सापुचेपुते या रस्त्याला चार कोटीचा निधी मंजूर करून आणला. उलट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली आणण्याचे काम उदय सामंत या एकमेव गद्दारांने केले आहेत आणि त्यांना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ अशा प्रकारचे विधान केले होते. त्याला शंकर गोरे यांनी जोरदार विरोध करत तीन प्रश्न विचारून निरुत्तर केले होते.
या पार्श्वभूमीवर आज लांजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. गेल्या पंधरा वर्षात आमदार म्हणून राजन साळवी यांनी या मतदारसंघात किती विकास केला आहे हे जनतेला ज्ञात आहे. आणि म्हणूनच मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. आणि म्हणूनच 2024 च्या निवडणुकीत कोण कोणाला गाढते यापेक्षा गेल्या दहा वर्षा किती विकास झाला हे बघूनच लोक मतदान करतील आणि संबंधितांना त्यांची जागा दाखवून देतील असे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई हे म्हणाले यानंतर आमदार राजन साळवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे तालूका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका महिला संघटक रसिका मेस्त्री, विभाग प्रमुख अनिल गुरव ,युवा सेना तालुका अधिकारी राजू धावणे, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, युवा शहराधिकारी प्रसाद भाईशेट्ये ,त्याचप्रमाणे भाई कामत, संजय तेंडुलकर आदींसह अन्य शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.