रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंटस ऑफ इंडिया या नामवंत संस्थेतर्फे पूर्ण भारतात मेगा करिअर कौन्सेलिंग मीट आणि करियर इन अकाउंट्स अँड फायनान्स असे दोन उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आयसीएआयच्या रत्नागिरी शाखेच्या सदस्यांनी फाटक हायस्कूल या शाळेमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे व खजिनदार सीए अक्षय जोशी उपस्थित होते.
फाटक हायस्कूलच्या शिक्षिका सौ. आगाशे यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर सीए मुकुंद मराठे यांनी करिअरबद्दल दहावी पासूनच जागरूकतेचे महत्व, सीए या व्यवसायाची विश्वभरात असणारी व्याप्ती तसेच सीए या करिअरची प्राथमिक स्वरूपातील माहिती दिली. सीए अक्षय जोशी यांनी पीपीटीचा वापर करून सीए या करिअरची विस्तृत स्वरूपात माहिती दिली. सीएच्या अभ्यासक्रमाची माहिती, त्यासाठी लागणारा अवधी आणि त्यासाठी लागणारा खर्च इ. बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. सीए करियरसाठी लागणारे परिश्रम आणि त्यातून निखरणारे व्यक्तिमत्व आणि पुढे उभा रहाणारे उत्कृष्ट करियर याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेने करियर मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या संधी साठी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला ब्रॅंच इन चार्ज सोनल आंब्रे यांचे सहकार्य लाभले.