प्रवाशांना नाहक त्रास दिल्यास कारवाई अटळ – पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे

वैभववाडी पोलीस ठाण्यात रिक्षा व्यावसायिकांची बैठक संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : नियम व अटींचे पालन करुन रिक्षा व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा. प्रवाशांना नाहक त्रास देऊ नये. जादा भाडे आकारल्याची तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. अशा सक्त सूचना वैभववाडी पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे यांनी दिल्या. गणेश उत्सवदरम्यान काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्याची दखल घेत वैभववाडी तालुक्यातील रिक्षा चालकांची बैठक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी रिक्षा व्यवसायीकांसोबत चर्चा केली. यावेळी मेंगडे बोलत होते.

यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेश सरवणकर, सचिव दीपक  भोसले, तसेच रेल्वे स्टेशन वैभववाडी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बोडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते. यावेळी मेंगडे म्हणाले, आपण रिक्षा व्यवसाय करीत असताना आरटीओने निर्धारीत केलेल्या नियमांचे पालन केले पाहीजे. काही रिक्षा चालक चुकीचे वागत असतील तर त्यांना रिक्षा संघटना म्हणून तुम्ही समज दया. तुमचेही एकत नसतील तर आम्हांला सांगा. आम्ही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करु. माञ नागरीकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार यापुढे येणार नाही. याची खबरदारी सर्व रिक्षा व्यवसायीकांनी घ्यावी. राञीच्यावेळी महिला प्रवाशी व लहानमुले यांच्याशी सौजन्याने वागले पाहीजे. कोणी चुकीचे वागल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल. आपण प्रामाणिकपणे व्यवसाय करा. आमचेही सहकार्य राहील.

तसेच तालुक्यातील सर्व रिक्षा चालकांनी आपले आधार कार्ड, आ.सी.बुक झेराॕक्स येत्या महिनाभरात पोलिस ठाणेत जमा करावीत अशी सूचना केली.