वैभववाडी | प्रतिनिधी
ऑनलाईन जादा पैसे मिळविण्याच्या नादात एका उच्चशिक्षित दाम्पत्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 17 लाख रुपये गायब झाले आहेत. नावाची बदनामी नको म्हणून त्यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दिलेली नाही.
संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर ऑनलाईन पार्ट टाईम रेटिंगद्वारे पैसे कामावण्याची संधी असा मेसेज आला होता. पैशाच्या अमिषाने या अँप द्वारे त्या महाशयांनी आपला कोड नंबर टाकून पैसे गुंतविण्यास सुरुवात केली.सुरुवातीला काही दिवसांत त्यांना भरलेली रक्कम व कमिशन असे काही हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे त्यांनी आपलें रेटिंग वाढवून जादा पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला एक दोन वेळा त्यांना परतावा मिळाला. त्यामुळे त्यांचा या ऑनलाईन पार्ट टाईम रेटिंगवरील विश्वास वाढला. त्यामुळे तशी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात त्यांनी सुमारे सुमारे 16 लाख 91 हजार रुपये स्वतःकडील रक्कम गुंतविली. या रक्कमच्या बदल्यात त्यांना 26 लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसेही आले. मात्र प्रत्यक्षात त्यांना मिळू शकले नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे आपल्याला कमिशन नको मला माझी मूळ रक्कम परत करा अशी मागणी केली.
आपली मूळ रक्कम ही मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याने त्यांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दिली आहे. मंगळवारी वैभववाडी पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला त्यांनी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली परंतु नंतर दोन दिवसाने तक्रार देतो असे सांगून निघून गेले. घडलेल्या प्रकाराची उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे.