तांदुळवाडी किल्लावरील दुर्ग संवर्धन मोहीम

ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या १४ वर्षापासून महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करत आहे.दुर्ग संवर्धनाची लोक चळवळ हि मोठ्या प्रमाणात वाढावी आणि गडकोटांचे पुनर्वैभव प्राप्त व्हावे म्हणून आम्ही कटीबद्ध आहोत.

संस्थेचे कार्यअध्यक्ष आ.संजय केळकर यांच्या नेतृत्वाने ठाणे व पालघर जिल्ह्यातील गडकोट मोहिमा तसेच सामाजिक उप्रकम सुरु आहेत. तांदूळवाडी किल्ल्यावर संस्थेमार्फत सन २०१८ पासून दुर्ग संवर्धन कार्य सुरु आहे. अशी माहिती मुंबई विभागाचे श्री.विल्सन रॉड्रिक्स आणि श्री.राजाराम खरात यांनी दिली.

दि.८ऑक्टोबर २०२३ रोजी तांदुळवाडी किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभाग आयोजित दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमे दरम्यान सफाळे रेल्वे स्थानकापासून तांदूळवाडीगाव येथे जाणार व तांदूळवाडीगा ते गडमाथा या वाटेवर दिशा दर्शक फलक लावण्यात आले. तर दुर्गवास्तू दर्शविणारे स्थळदर्शक, किल्ल्याचा इतिहास फलक आणि सूचना फलक हि लावण्यात आले. तटबंदी व बुरुजासह बालेकिल्ला परिसरातील अतिरिक्त गवत व झुडपे काढण्यात आली. येत्या वर्षभरात संस्थेमार्फत विविध संवर्धन कामे किल्ल्यावर करण्यात येतील. तसेच उपस्थितांना किल्ल्याचे दुर्गअवशेष माहिती देऊन इतिहासाला उजाळा देण्यात आला.

या मोहिमेस परिक्षेत्र वन अधिकारी सफाळे,सौ.संगीता काकडे (सरपंच,तांदूळवाडी) श्री.रमेश सावरे,श्री.प्रशांत सोगम(अध्यक्ष- वसई-विरार विभाग) आणि तांदूळवाडी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मुंबई,वसई विरार,भिवंडी,ठाणे,कल्याण,सिंधुदुर्ग येथील सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.त्यांचे आभार जतीन तांडेल,रुपेश पवार आणि सुरज देसाई यांनी व्यक्त केले.

इतिहास- हा किल्ला कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी किंवा माहिमचा राजा प्रतापबिंब यांनी बांधला असावा. इ.स.१४५४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादुरशहा याने मलिक अल्लाऊदिन नावाच्या सरदारास सामानगड व तांदूळवाडीचा किल्लेदार नेमले होते. इ.स.१७३०-३१ मध्ये पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारामुळे पेशव्यांना कोकणात मोहीम आखावी लागली. तेव्हा मराठ्यांनी कांबे(भिवंडी),केळवे,मनोर आदी ठाणी जिंकली.इ.स.१७३१ जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मराठ्यांनी तांदूळवाडी किल्ला हि जिंकून घेतला.इ.स.१० फेब्रुवारी १७३२ मध्ये पोर्तुगीज व पेशवे यांच्यात झालेल्या तहात १७३० पासून मराठ्यांनी जिंकलेले किल्ले,लुटलेल्या तोफा व पकडलेले कैदी पोर्तुगीजांना परत करावे लागले. त्यामध्ये तांदूळवाडी किल्ला हि मराठ्यांनी पोर्तुगीजांना परत केला.

इ.स.१७३७-१७३९ मध्ये चिमाजी आप्पांच्या कोकण जिंकण्याच्या मोहिमेला इ.स.१७३७ मे महिन्याच्या सुरवातीला विठ्ठल विश्वनाथ व आवजी कवडे यांच्या नेतृवाखाली एक फौज तांदूळवाडी किल्ल्यावर पाठविण्यात अली होती.२ मे १७३७ रोजी तांदूळवाडी किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला व तेथे मराठ्यांचे ठाणे प्रस्थापित केले. ८ मे १७३७ रोजी तांदुळवाडी किल्ला ज्या शिताफीने आणि झपाट्याने केलेल्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून चिमाजी आप्पाने पाचशे रुपये शिबंदिला पाठवले अशी पेशवा दफ्तरात नोंद आहे. इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. असे प्रसिद्ध पत्रकार श्री.संदेश भोईर यांनी इतिबद्ध केल. पर्यटकांसाठी – या किल्ल्यावर सफाळे रेल्वेस्थानका पासून एस.टी.ने तांदूळवाडी गाव इथे जाता येते.तांदूळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो.सोबत उपयुक्त साहित्य व पुरेसे पाणी ठरवावे .वाटेत दिशा दर्शक असल्यामुळे वाट सापडण्यास सोयीचे ठरेल. दुर्ग संवर्धन कार्यात शिवप्रेमींनी सहभाग व्हावे असे आव्हान मुंबई अध्यक्ष श्री.रोहित देशमुख यांनी केले.