कोकणचा भोपळा मुंबईत … !

माझे कोकण | संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, गारपीट किंवा अति उष्मा झाली की राज्यातील शेतकरी त्रस्त होतात. स्वत:च कष्टाने उभ्या केलेल्या बागायतीत बुलडोझर फिरवण्याचा आततायीपणा कोकणातील कुण्या शेतकऱ्याने कधी केला नाही.स्वत:च्या शेतीची, बागायतीची नासधूस केलेली आजवर कधीही घडलेलं नाही. उलट शेती बागायतीमध्ये जरी उत्पन्न कमी आलं तरीही त्याचा राग शेतात काढला जात नाही हे कोकणातील शेतकऱ्याचे वैशिष्ट्य आहे. शेती बागायतीमधील नुकसान हे कोकणात असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रात असेल ते सारख्याच प्रमाणात होत असते. कोकणात कधी आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी बागायतीत नुकसान होते. तर उर्वरित महाराष्ट्रात ऊस, कापुस, द्राक्ष, डाळींब, मोसंबी, टोमॅटो, भाज्या या सगळयात केव्हा ना केव्हा नुकसान झालेलच असत. कधीतरी अवकाळीचा फटका किंवा कडाक्याची थंडी कोकणातही असतेच. परंतु कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही फार आदळआपट न करता आलेल्या प्रसंगाला सामोरे जातो. कोकणातील शेतकरी काही गर्भश्रीमंत नाही. त्याचबरोबर तो कर्जबाजारीही नाही. नको तितका कर्जाच ओझ घेऊन इथला शेतकरी वावरत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला कोणी आळशी म्हटला तरीही तो कष्ट घ्यायचे, काम करायच तेव्हा करतो. गरजेपुरत नक्कीच शेतात राबतो. पूर्वी थोडच काम करायचे. कमी कष्ट घ्यायचे पण अलिकडे कोकणातील शेतकरी आयडियल शेती, बागायती करतोय. इथे मला कोकणातील शेतकरी आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी यांच्यामध्ये कोणतीही तुलना करायची नाही. तो माझा हेतूही नाही. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी काहीवेळा अनुकूल परिस्थितीत तर दुष्काळी भागात पाण्याची उपलब्धता नसतानाही ज्या प्रयोगशिलतेने कष्ट घेतले जातात ते निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्शवत आहेतच. म्हणूनच ऊसाच्या शेतीतून पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी उभी राहिली, बहरली त्यातून शेतकरी आणि सामान्यांचे कौटुंबिक जीवन अधिक सुखकर झालं. कोकणही आता बदलतय. शेती क्षेत्रातही नवनविन प्रयोग होत आहेत. कोकणातील भोपळा मुंबईच्या वाशीमार्केटला विक्रीला जातोय. ही न्यूज किती सुखावणारी आहे याचे कारण भोपळयाची आणि आजीबाईची गोष्ट आपण आपल्या बालपणी आजच्या पन्नाशीत, साठीत, सत्तरीत असणाऱ्या सर्वांनीच ऐकलेली आहे. म्हातारी आजी भोपळयात बसून कशी गेली असेल असा प्रश्न जरी आजच्या घडीला पडला असला तरीही आजीबाईंची भोपळयातून होणारी सैर सर्वांच्याच जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील भजनीबुवा संतोष कानडे यांनी आपल्या कोकणातून भोपळा मुंबईत पाठवला जातो. त्याच पिक कस घेतलं जात याबद्दल भरभरून ते बोलत होते. कोकणातून आंबा, फणस, जांभुळ मुंबईला जातात हे माहिती होत. त्यातही आंबा मुंबईत वाशीमार्केटला जातो ही माहिती होती. फणस दरवर्षी वटपौर्णिमेला कोकणातून मुंबईत जातात. परंतु आता भोपळाही कोकणातून वाशीमार्केटला जातो. तो देखिल मोठ्याप्रमाणावर जातो. या भोपळयासंबंधी मालवणी मुलखात एक वंदता होती. पूर्वी कोणी मोठ्याप्रमाणावर भोपळयाच पिक घेत नव्हते. गुरांच्या गोठ्यावर, मांगरावर वेल सोडलेला असायचा. या सोडलेल्या वेलीला जे काही भोपळे धरायचे त्याच कोणी कोकणात मार्केटिंगही करीत नव्हते की काहीही जर भोपळे पाच-सहा आले तर शेजारी गावातल्या कोणालाही फुकटच दिले जायचे. आज कोकणातील बाजारातही भोपळयाच्या ‘भेशी’ करून विकल्या जातात. आणि गाववालेही पूर्वी सहज उपलब्ध असणारा भोपळा पाच-पन्नास रूपये देऊन भेस विकत घेतात. हा बदल आता कोकणातील बाजारातही झालेला दिसून येत आहे. कोकणात भोपळा पिक घेता येईल हे सर्वांनाच माहित होतं. परंतु त्याच मार्केट आणि मोठ्याप्रमाणावर पिक घेऊन त्याची व्यवस्था करता येऊ शकते हे कोल्हापूरचे दिपक कासोटे यांनी गडमठ ता. वैभववाडी गांवी भोपळयाची शेती केली आणि कोकणातून भोपळा मुंबईच्या बाजारात विकता येईल हे दाखवुन दिले. सुभाष मर्ये, सिद्धेश वारंग अशा अनेक शेतकऱ्यांनी भोपळा पिक घेऊन वाशीमार्केटला पाठवल. चांगल पिकही आलं आणि पैसेही मिळाले. भोपळा पिक घेताना त्यात पूर्णपणे एक व्यावसायिक म्हणूनच त्यात उतरलोय. त्याचा चांगला फायदाही होतोय असे पियाळी गावचे संतोष कानडे यांनी सांगितलं. कोकणातील शेती, बागायतदार केवळ आंबा, काजू, सुपारी पुरताच मर्यादित राहिलेला नाही. शेतकरी आता बांबुचीही लागवड करू इच्छितोय. कलिंगडाची लागवड करून त्यातूनही पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. भातशेतीतही संकरीत भात बियाण्यांतून चांगल भातपिक घेण्याचा प्रयत्न तरूण शेतकरी करतात. फक्त हे सर्व आता अधिक प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. कोकणात पिकणाऱ्या प्रत्येक फळाला एक वेगळा स्वाद आणि टेस्ट आहे. आज मोठया शहरातील मार्केटमध्ये आंबा कोणताही आला तरीही कोकणातील हापूसची टेस्ट कुठल्याच आंब्याला येणारी नाही. कर्नाटक, गुजरातमधूनही आंबे बाजारात येतात. देवगड हापूसच्या नावावर त्याची विक्रीही होते. कोकणातील काही आंबा बागायतदारांनी कर्नाटक हापूस कोकणचा हापूस म्हणून मुंबईच्या बाजारात नेल्याची चर्चा मुंबईच्या मार्केटमध्ये होती. असं असेलतर ही अतिशय गंभिर आणि आपणच आपलं प्रचंड मोठं नुकसान करणारी गोष्ट आहे. क्षणिक पैशांसाठी स्वत:च ‘स्वत्व’ विकण्याचा हा प्रकार आहे. ही चर्चा जर सत्य असेल तर भविष्यात असं काही घडणार नाही याची काळजी कोकणातील सर्वच बागायतदारांनी घेण्याची आवश्यकता आहे. कोकणातील आजीबाईला गोष्टीतला भोपळा मुंबईच्या बाजारात जातोय हे निश्चितच आनंददायी आहे. कोकणात भोपळा म्हाळवसात, ग्रामदेवतांच्या समराधनांमध्ये भाजीत दिसायचा. असाच तो देशभरातील अनेक बाजारपेठांमध्येही कोकणातील भोपळा दिसावा.