अस्वस्थ करणाऱ्या किंवा नैराश्य आणणाऱ्या घटनांचं चित्रण दाखवण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व दूरचित्रवाहिन्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दूरचित्रवाहिन्याच्या प्रेक्षकांमधे लहानथोरांचा समावेश असतो. त्यामुळे अपघात, किंवा अपमृत्यू, महिला, मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकांप्रति हिंसा अशा घटनांचं चित्रण दाखवताना सभ्यतेचे आणि शिष्टाचाराचे संकेत पाळावेत, तसंच खाजगीपणाच्या मर्यादा पाळल्या जाव्यात, असं मंत्रालयानं या वाहिन्यांना सांगितलं आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह, किंवा गंभीररीत्या जखमी व्यक्ती, दुर्बलांना निर्दयपणे मारहाण करण्याचे प्रसंग दूरचित्रवाहिन्यांवरुन दाखवले जातात असं आढळल्यावरुन हे निर्देश जारी केले आहेत. अनेकदा ही चित्रणं किंवा प्रतिमा समाजमाध्यमांवरुन घेतली जातात, त्यावर कोणाचाही अंकुश नसतो, त्यामुळे अशा दृष्यांबाबत योग्यायोग्यतेचे नियम ठरवावेत, असं वाहिन्यांना सांगण्यात आलं आहे.