नवसरणी सभागृहात आयोजित शोकसभेत मान्यवरांकडून आदरांजली
सावंतवाडी । प्रतिनिधी : सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचं सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदान चिरंतन स्मरणात राहील. त्याचबरोबर सैनिक बांधवांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी केलेले कार्य देखील फार मोलाचे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली सैनिकी परंपरा आदर्शपणे जपण्याचं महान कार्य त्यांनी केलं आहे. देशाच्या अशा आदरणीय आणि वंदनीय सैनिकाला सॅल्यूट करणे त्यांच्या सेवेप्रती वंदन करणे हे मी माझं कर्तव्य मानतो. त्यामुळे त्यांचं हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपकभाई केसरकर यांनी ख्रि. पी. एफ. डॉन्टस यांच्याप्रती आदरांजली वाहिली. सावंतवाडी नवसरणी येथील सभागृहात आयोजित शोकसभे प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसूझा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे -परब, एम. डी. देसाई, बाबुराव कविटकर, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सैनिक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम जोशी, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, मायकेल डिसोझा, एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, दिनानाथ सावंत, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र मडगांवकर, रुजॉय रोड्रिक्स, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, चंद्रशेखर जोशी, सुरेश भोगटे, राजू मसुरकर, राजू तावडे, फ्रान्सिस रोड्रिक्स, नीरज देसाई, सैनिक पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, दीपक राऊळ, कर्नल विजयकुमार सावंत, कुंदा पै, दिलीप भालेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, जिल्ह्यातील आजी – माजी सैनिक, डॉन्टस कुटुंबीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, सहकार तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सादर करताना सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी पी. एफ. डॉन्टस यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, डॉन्टस साहेब हे पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या रुपाने नेतृत्व गुणांनी ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे. आमच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे असणारे डॉन्टस साहेब अत्यंत तळमळीने काम करणारे अभ्यासू नेतृत्व होतं. माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम केलं. सहकार क्षेत्रात खंबीर नेतृत्व त्यांनी केलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय व हक्कासाठी प्रशासनाशी लढा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉन्टस साहेब होते. सैनिक पतसंस्था निर्मितीत त्यांचा मौलिक वाटा आहे. सहकार क्षेत्राचा अभ्यास आणि दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व होतं. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आजी – माजी सैनिकांसाठी काम केलं. जे अनेकांना प्रेरणादायी आहे. इंडियन एक्स सर्व्हिसेस लीगचे सलग १५ वर्षे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व त्यांनी केलं. कॅथलिक बांधवांसाठी देखील त्यांनी सामाजिक, आर्थिक क्षेत्रात कार्य केलं आहे. जिल्ह्यातील मुलं अधिकारी होण्यासाठी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल निर्मितीत देखील ब्रिगेडिअर सावंत यांच्यासोबत त्यांनी महत्वाचे काम केलं आहे. त्यांचं हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केली. दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. पी. एफ.डॉन्टस यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.