मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यात मुख्यालयासह नविन जिल्ह्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मंडणगड तालुका पत्रकार संघाचेवतीने उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 8 ऑक्टोंबर 2023 रोजी मंडणगड येथे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनातील माहीतीनुसार राज्यातील नवीन 22 जिल्ह्याचा प्रस्ताव राज्यशासनाच्या विचाराधीन आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (आंबडवे) मुळगाव असलेल्या मंडणगड तालुक्याने सन 2014 सालीच तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 32 लोकसभा मतदार संघाचे धर्तीवर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील लगतच्या आठ तालुक्याचा मिळून मंडणगड येथे मुख्यालय असलेला मंडणगड जिल्हा नव्याने निर्माण करावा अशी मागणी केली होती. 11 फेब्रुवारी 2014 जिल्हा निर्मीती समिती मंडणगड यांनी केलेल्या मागणी अर्जाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी ही रितसर मागणी मान्य करुन या संदर्भात 24 जून 2014 रोजी जिल्हा विभाजनाबाबतचे निकष ठरविण्याकरिता अ.मु.स (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्र.प्राफेब 2014/प्र.क्र.87/ म-10 दि.24/10/2014 रोजी शासन निर्णयान्वये समितीचे गठन केले आहे.
राज्यातील जिल्ह्याचे विभागाचे प्रस्ताव राज्यशासनाच्या विचाराधीन असल्याने मंडणगड येथे मुख्यालय असलेल्या नवीन जिल्ह्याचे निर्मतीची मागणी निवेदनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने करण्यात आली आहे. पेशव्यांचे कारभारी नानासोहब फडणवीस व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव असलेला मंडणगड तालुक्याचा विचीत्र भौगोलीक परिस्थीतीमुळे म्हणावा असा विकास झालेला नाही. सद्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी या मुख्यालयापासून मंडणगड तालुका दोनशे किलमीटर इतका लांब आहे ही बाब लक्षात घेता शासकीय कामासांठी मुख्यालई जावून एका दिवसात परत तालुक्यात येणेही अशक्य आहे ही बाब लक्षात घेऊन गत नऊ वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड खेड दापोली गुहागर व रायगड जिल्ह्यातील पोलादपूर श्रीवर्धन माणगाव महाड या तालुक्याचा मिळून मंडणगड जिल्हा नव्याने प्रस्तावीत करावा अशी मागणी केली जात आहे. जन्म व मृत्यदर स्थिर असताना केवळ स्थानीक पातळीवर रोजगाराच्या संधी नसल्याने तालुक्यातील कर्त्या लोकसंख्येचे मुंबई व पुणे या नजीकच्या महानगराकंडे स्थलांतर झाले आहे 2001 साली 73 हजारांच्या घरात असलेली लोकसंख्या 2023 साली 50 हजार इतकी कमी झाली आहे.
महानगरांपासून चार तासांचे अंतरावरही असूनही विविध कारणांनी तालुक्याचा विकास झालेला नाही ही बाब लक्षात घेता नवीन जिल्ह्याचे मुख्यालयामुळे मंडणगड तालुक्यास नवी ओळख मिळू शकेल त्यामुळे राज्यशासनाकडे गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मागणीचा साकल्याने विचार करुन जिल्हा मुख्यालयासह मंडणगड या नव्या जिल्ह्याचे निर्मीतीकरिता शासन स्तरावर कार्यवाहीस सुरुवात व्हावी अशी विनंती करण्यात आली या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पवार, प्रशांत सुर्वे, विनोद पवार, सचिन माळी, अँड. दयानंद कांबळे, विजय जोशी आदींच्या सह्या आहेत. या विषया संदर्भात शासन जेव्हा केव्हा या संदर्भात पुढील कार्यवाही करेल त्यावेळी मंडणगड तालुक्याचा प्रामुख्याने विचार करण्यात येईल असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अश्वासीत केले आले आहे.