आरपीआयच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन मंडणगड जिल्ह्याची मागणी  

जिल्ह्याला आंबडवे नाव द्यावे ; जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांचा पुढाकर 

मंडणगड : प्रतिनिधी l मुख्यालयासह नवीन स्वतंत्र मंडणगड जिल्ह्याची मागील दहा वर्षांपासूनची मंडणगडवासीयांच्या मागणीचा सरकारने अग्रक्रमाने विचार करून मंडणगड जिल्ह्याची निर्मिती करावी व जिल्ह्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले ‘आंबडवे’ या गावाचे नाव द्यावे, अशी मागणी आरपीआयच्या वतीने रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

त्यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी मंडणगड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली, यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सरकार योग्य विचार करेल असे आश्वासन दिले असल्याचे श्री. मर्चंडे यांनी माध्यमांना सांगितले.

निवेदनातील माहितीनुसार, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्याला मुख्यालयासह जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी मंडणगडसह प्रस्तावित तालुक्यांची व विविध संस्था व संघटनांची मागणी आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंडणगड जिल्हा निर्मिती समितीने दहा वर्षांपासून सरकार स्तरावर पत्रव्यवहार केले आहेत. या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करावा.

मागणीमध्ये रत्नागिरीतील मंडणगड, दापोली, खेड या तीन व रायगड मधील महाड, म्हासळा, माणगाव, श्रीवर्धन, पोलादपूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांसाठी मंडणगड केंद्रस्थानी आहे. भौगोलिक दृष्ट्या या सर्वच तालुक्यांना सद्या अस्तित्वात असलेले जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण खूपच लांब आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सदर भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागात विविध प्रशासकीय योजना सक्षमपणे राबवल्या जात नाहीत. लांब पल्ल्याचे अंतर प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचे ठरते. उपरोक्त तालुक्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी व महान व्यक्तिमत्वाचा वारसा असून देखील केवळ जिल्ह्याचे मुख्यालय दूरवर असल्याकारणाने हे तालुके विकासापासून लांब राहिले आहेत.

विकासाची प्रक्रीया सर्वदूर नेण्याचे शासनाचे जनकल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंडणगड तालुक्यास मुख्यालयासह जिल्ह्याचा दर्जा दिल्यास मंडणगड तालुक्यासह समाविष्ठ सर्व तालुक्यांचे आगामी काळातील वाटचाल अतिशय सुलभ होण्यास मदत होणार आहे.