छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार

किल्ले राजकोट येथे गतिमानरित्या काम सुरु : सार्वजनिक बांधकाम विभाग अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून पाहणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग परिसरात 4 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या नौदल दिन सोहळ्या निमित्त मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी होत आहे. गतिमानरित्या कामे सुरु आहेत. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी याठिकाणी भेट देऊन सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.

दरम्यान 28 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट येथे दाखल होणार आहे. त्यानंतर पुतळा उभारणी व उर्वरित कामे 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जातील. अशी माहिती उपस्थितीत अधिकारी यांच्या चर्चेतून प्राप्त झाली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांसह मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण शरद राजभोज, अधीक्षक अभियंता रत्नागिरी छाया नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता कणकवली सिंधुदुर्ग अजयकुमार सर्वगोड, प्रांतधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यासह बांधकाम, महसूल व अन्य विभाग अधिकारी उपस्थित होते.


मालवण येथील गव्हर्मेंट रेस्ट हाऊस नव्याने उभारणी तसेच दुसऱ्या इमारतीची दुरुस्ती सुरु आहे. येथील कामांचा आढावा अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या वतीने घेण्यात आला. दोन्ही इमारतींची कामे 31 ऑक्टोबर पर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काम सुरु असल्याचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी यावेळी सांगितले.

तारकर्ली एमटीडीसी स्कुबाडायविंग सेंटर येथे आढावा बैठक

अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत तारकर्ली एमटीडीसी येथेही पाहणी केली. त्यानंतर तारकर्ली एमटीडीसी स्कुबाडायविंग सेंटर येथे आढावा बैठक घेतली. सुरु असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

किल्ले सिंधुदुर्ग येथे पाहणी

सार्वजनिक बांधकाम विभाग अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी सायंकाळी किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी भेट देत पाहणी केली. येथील मंदिरांची व परिसराची पाहणी करत आढावा घेण्यात आला.