मित्रत्व म्हणजे विश्वासाच्या पुला- खालून खळाळणारा आनंदाचा प्रवाह ! – बचपन के दोस्तांचे मनोगत !

 

फोंडा हायस्कूल सन ७४- ७५ च्या बॅचचा स्नेहोत्सव, अथांग समुद्राच्या साक्षीने, देवगडमध्ये उत्साहात !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी -: मैत्री म्हणजे वर्गातील खट्याळ मित्र-मैत्रिणींना जोडणारा पूल ! आणि त्याच्या सानिध्यात खळखळून वाहणारा आनंदाचा प्रवाह म्हणजे स्नेहोत्सव ! संकटकाळी सहकार्य अन् आसवं पुसणारा हात तर उत्कर्षाच्यावेळी शाब्बासकीची थाप ! असा हा विश्वासार्हता जपणारा “बचपन के दोस्त” चा वयाच्या ६५ ला पोहोचणारा आपला ग्रुप,तहयात प्रवाही राहावा आणि दरवर्षी नव-नवीन नेतृत्वाने साजरा करावा अशी अपेक्षा सर्वच मित्र-मैत्रिणींनी व्यक्त केली. फोंडाघाट हायस्कूल मधील १९७४-७५ वर्षीच्या, जुन्या अकरावी तुकडीचा, स्नेहोत्सव निसर्गरम्य देवगड परिसरातील इंद्रप्रस्थ येथे उदंड उत्साहात संपन्न झाला.

गेली तीन-चार वर्ष एकत्र येण्याची उपरती झालेल्या, त्याकाळच्या अन् आज गाडी उताराला लागली असताना, जबाबदारीतून काही प्रमाणात मोकळे झालेल्या वर्गातील मित्र-मैत्रिणींनी “बचपन के दोस्त” ग्रुप च्या माध्यमातून स्नेहमेळावा आयोजित केला. माधव निवासच्या पटांगणामध्ये गाड्या पार्क करून सर्वजण शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळा आवारात पोहोचले. स्नेहोत्सवाची सुरुवात श्री.व सौ. हिरा रवी बागवे यांनी श्रीफळ वाढवून केली. प्रशालेला अभिवादन करून सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. आणि कार्यक्रम स्थळी प्रस्थान केले. देवगड येथील वॅक्स म्युझियम मधील जिवंत पुतळ्याकडून इतिहास जागा झाल मणेरीकर सरांची आठवण झाली.पुतळे जणू बोलू लागले. आणि इतिहासाचे संक्रमणातून आठवणी जाग्या झाल्या. माहिती मिळाली. प्रत्येकाने आपल्या आयकॉन सोबत फोटो संस्मरणीय केले. तेथून अथांग समुद्र आणि लगतच्या सर्वांग सुंदर बगीचा न्याहाळताना गप्पागोष्टींना बहर आला. सेल्फी पॉईंट अन समुद्र जवळील पवनचक्कीची हळुवार फिरणारी जीवनपाती आपल्या मोबाईल मध्ये बंदिस्त करताना,प्रत्येक जण धडपडत होता. रात्री भोजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा बहर दिगंबर राणे,नीतू पटेल, कर्णिक वहिनी, उषा पवार,रजनी, सुरेश कुरतडकर,शिल्या फर्नांडिस, सहदेव बागवे,सुरेश तळेकर,परुळेकर उभयतांसह सर्वांनीच आपल्या काहीशा उतार स्वरात कलागुणांना वाट करून दिली. भेंड्या- गाणी आणि विविध गुणदर्शनाने रात्र साजरी झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या दिवंगत मित्र-मैत्रिणींना सौ. दुर्गा करंबेळकर, विलास कल्याणकर, साटम, सौ.सुप्रिया कोरगावकर यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्य सोहळ्या दरम्यान परिवारातील ज्येष्ठ सदस्यांनी दीप प्रज्वलित केला. गेल्या वर्षभरात वाढदिवस असलेल्या स्नेह्यांचे औक्षण करून, केक कापत सर्वांचे टाळ्याच्या गजरात अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी महिलामैत्रिणीनी एकमेकांना हळदीकुंकू व भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या देहबोलीतून या वयात देखील स सौदार्हाची आणि आपुलकीची भावना ओतप्रोत दिसून येत होती. सर्वांचा प्रातिनिधिक सत्कार आबा सामंत उभयतांनी स्वीकारला. भरपेट नाष्ट्यानंतर सर्वांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेत निरामय आरोग्य आणि सुख शांतीसाठी सांगणे केले. समोरील अथांग समुद्रात वय विसरून सर्वांनी वाळू आणि पाण्यात मनमुराद आनंद लुटला. दुपारी मुणगे येथील श्रीभगवतीदेवीच्या दर्शनाचा आणि जत्रोत्सवातील शेवटच्या दिवशीच्या गर्दीचा, विशेषतः चाकरमानी मित्र-मैत्रिणी उत्सुक्यपूर्ण आस्वाद घेतला.

जेवणानंतर निरोप प्रसंगी स्नेहसोहळा आणि मैत्री यावर आपल्या विचारांना सर्वांनीच वाट मोकळी करून दिली. स्नेहोत्सव आणि “बचपन के दोस्त” ची संकल्पना स्व.शमी डोरले आणि उज्वला सामंत यांनी अमलात आणली. आणि आज त्याचे मूर्त रूप म्हणजे हा स्नेहसोहळ्याचा पासष्टीतील वर्ग! तसाच खटाळपणा, तोच खोडकरपणा, त्यामुळे काहींना रागवावं, काहीना गोंजाराव तर काहींना शिक्षापण ! हे सर्व करत असताना सलोखा आणि सामंजस्यांनी सोहळ्याच्या क्षणांना आनंद- चैतन्य आणि ऊर्जेची साथ द्यावी लागते. हे कार्य ग्रुप मधील सदस्य करतात याचा आनंद आज ओसंडून वाहत आहे. या सोहळ्यातून वर्षातून एकदा या वयात कुटुंब परिवारासह एकत्र येताना,त्यांना प्रत्येकाचे गुणदोष-संसारातील प्रवास-सुखदुःखाचे आदान प्रदान होताना अनामिक ओढ निर्माण होते.आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, ऊर्जा मिळते आणि सौख्याच्या आठवणी पुढील आयुष्य जगण्याची उर्मी देतात.अशा भावनांनी सर्वजण भावनिक झाले. कुमार नाडकर्णी यांनी सर्वांना चूक-भूल माफ करत, नवीन नेतृत्व तयार व्हावे, ग्रुपचं अस्तित्व अखंड राहावं आणि आनंदोत्सव दरवर्षी पार पाडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गळाभेट घेत आणि पुन्हा भेटू—च्या खैरातीवर एकमेकांनी निरोप घेतला. गाड्या घराकडे सुटल्या. मात्र नेहमीप्रमाणे हुरहुर कायम होती, पुनः भेटण्याची ——-