पेंडूर मांड उत्सवातील ‘दीपोत्सव’ सोहळा ठरला लक्षवेधी

मालवण | प्रतिनिधी : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावच्या १४ दिवसांच्या मांड उत्सवानिमित्त ११ व्या दिवशी सोमवार रात्रौ ‘दीपोत्सव’ साजरा करण्यात आला. पाच मानकरी (रायकर परब, मसणे परब, सावंत पटेल, सावंत आणि कुळकर्णी) बारा देवसेवक व देवस्थान ट्रस्ट समिती यांच्या हस्ते श्री देव वेताळ मंदिर येथे दीप प्रज्वलित करून लक्षदीप सोहळा दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर श्री देव वेताळ मंदिर व श्री देवी सातेरी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी दीप प्रज्वलित केले. या दीपोत्सव सोहळ्यास पेंडूर गावात जिल्ह्याभरातून तसेच मुंबई , पुणे, कोल्हापूर या भागातून पै – पाहुणे लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. दीपोत्सवानिमित्त मंदिराच्या परिसरात आकर्षक रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

दीपोत्सवानिमित्त प्रसिध्द रांगोळीकर समीर चांदरकर यांच्या आकर्षक सुबक रांगोळीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यानंतर रात्रौ असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री देव वेताळाची मंदिरातून पालखी मंदिर सभोवताली फिरविण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोलवादन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी बारा पाच मानकरी, देवस्थान ट्रस्ट यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योग्य नियोजन केले होते. प्रत्येक भाविकांने दीपोत्सव सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच श्री देव वेताळाचे रांगेत राहून भाविकांनी दर्शन घेतले. प्रत्येक भाविक हा मनमोहक सोहळा पाहण्यासारखा व नजरेत साठवून ठेवण्यासारखा होता.