साप्ताहिक जनयुगचे माजी कार्यकारी संपादक दिलीप खांडाळेकर यांचे निधन

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील साप्ताहिक जनयुगचे माजी कार्यकारी संपादक आणि रोटरी क्लब ऑफ मालवणचे संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष दिलीप देविदास खांडाळेकर यांचे शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे दिलीप देविदास खांडाळेकर यांचे माध्यमिक शिक्षण टोपीवाला येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सिंधुदुर्ग कॉलेज मालवण येथे झाले होते. क्रीडा क्षेत्रात रुची असणाऱ्या दिलीप खांडाळेकर यांनी तरुण वयात पत्रकारितेत प्रवेश करताना मालवणमध्ये जुन्या असणाऱ्या साप्ताहिक जनयुग च्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ लिलया पेलली होती. समाज सेवेची आवड असणाऱ्या दिलीप यांनी मालवणात रोटरी क्लब ही संस्था व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता. रोटरी क्लब ऑफ मालवणची अनेक पदे भूषवितानाच त्यांनी मालवणचे माजी अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. पत्रकारिते बरोबरच बांधकाम व्यवसायात त्यांनी उडी घेत शांतादुर्गा डेव्हलपर्सच्या माध्यमातून मालवणात दोन कॉम्प्लेक्सची उभारणी केली. मालवणचे ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक जनयुगचे मुख्य संपादक राजेंद्र खांडाळेकर यांचे ते बंधू होत. श्री. राजेंद्र खांडाळेकर यांच्या जोडीने काम करणाऱ्या दिलीप खांडाळेकर यांची साप्ताहिक जनयुगच्या दिवाळी अंकात विशेष छाप दिसून यायची. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणी असा परिवार आहे.