प्रहार’ च्या गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवर महिलांचा होणार सन्मान

माजी खासदार निलेश राणे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी : आपल्या कल्पकतेने लाडक्या बाप्पाचं मखर आणि त्यासोबतच सामाजिक संदेश देणारे देखावे उभारणाऱ्या कलाकार भक्तांचा आणि रत्नागिरीचा अभिमान, स्वाभिमान, कर्तृत्ववान असणाऱ्या प्रतिथयश महिलांचा सन्मान सोहळा उद्या रविवारी माजी खासदार तसेच प्रहारचे संचालक निलेश राणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.

प्रहार Digital News Channel, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित online घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा नुकताच निकाल प्रसिद्ध झाला असून त्याचा बक्षीस वितरण समारंभ उद्या रत्नागिरी शहरातील शिर्के प्रशालेतील रंजन मंदिर सभागृहत दुपारी 1 वाजता होत आहे. तर रत्नागिरीतील विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सन्माननीय महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रहार Digital News Channel, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान तसेच Balaji Security and Facilities Services , नृत्यार्पण नृत्य अकादमी आणि नंदाई Digital मार्केटिंग यांच्या वतीने यंदा प्रथमच Online घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हा बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरी शहरातील शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात रविवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील महेश शांताराम गुरव यांचा प्रथम, गव्हे पवारवाडी दापोली येथील अरुण काशिनाथ पालटे यांचा द्वितीय तर कल्पेश विकास रेळेकर, दापोली यांचा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आह. तर हातखंबा डांगेवाडी सागर सुरेश डांगे आणि आशिष अविनाश वाडकर, मिरजोळे यांच्या देखाव्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण रुपेश पंगेरकर आणि निलेश पावसकर कला शिक्षक तसेच सहभागी स्पर्धकांचाही सन्मान होणार आहे.

तर रविवारपासूनच नवरात्रीचा उत्सव सुरु होत आहे. या निमित्ताने रत्नागिरीतील विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा याच कार्यक्रमात सन्मान होणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील वंध्यत्वाच्या समस्येवर आशेचा किरण घेऊन आलेल्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे, जागृत मोटर्स सारखा उद्योग यशस्वीपणे चालविणाऱ्या उद्योजिका रेश्मा राजेंद्र जोशी, रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताना रोजगार मिळावा, उद्योगाना चालना मिळवी यासाठी मनापासून कार्यरत असलेल्या जिल्हा उद्योग विभागाच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवत रत्नागिरीचे नाव उज्जल करणाऱ्या खो खो पटू अपेक्षा सुतार, ऐश्वर्या सावंत, पुणे येथील आरामदायी आयुष्य असतानाही रिळ सारख्या गावात राहून पतीला मदत करत करत शेतीमध्ये रमलेल्या उच्चशिक्षित प्रगतीशील महिला शेतकरी सौ. संगीता वैद्य, दिव्यांगांच्याही चेहऱ्यावर हसू आले पाहिजे यासाठी काम करणाऱ्या सौ. सुरेखा पाथरे, सहकार क्षेत्रात महिलांना एकत्र आणून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणाऱ्या प्राची शिंदे, भरतनाट्यम ही कला आपल्यकडून दुसऱ्यांना देताना नृत्याचे पारंपरिक शिक्षण देत लहान वयात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या प्रणाली तोडणकर आणि घटस्फोटपर्यंत गेलेले पती पत्नी मधील कलह मिटवत वर्दीतील संवेदनशीलता जपणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता विभागातील हेड कॉन्स्टेबल सनाया कांबळे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रहार चे निवासी संपादक संतोष वायंगणकर, प्रहार डिजिटल न्यूज चॅनेलचे वृत्त संपादक हेमंत कुलकर्णी, बालाजी सेक्युरिटी अँड फॅसिलिटिज सर्व्हिसेसचे संचालक प्रवीण लिंगायत, मातृभूमी प्रतिष्ठानचे सिद्धेश धुळप, नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धीरज पाटकर हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार रत्नागिरी आवृत्ती प्रमुख नरेंद्र मोहिते आणि प्रहार डिजिटल रत्नागिरी ब्युरो चीफ अनघा निकम -मगदूम यांनी केले आहे.