सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक गजानन गंगाराम भागवत (९०, मूळ रा. वालावल ता. कुडाळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मळगाव हायस्कूलच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव हायस्कूलच्या सेवेत १९६५ ते १९९३ पर्यंत त्यांनी शिक्षण व मुख्याध्यापक म्हणून सेवा केली होती. निवृत्तीनंतर काही काळ मळगाव हायस्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. एक विद्यार्थी प्रिय मनमिळावू शिक्षक म्हणून ते प्रचलित होते. अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते डोंबिवली येथे आपल्या मुलासमवेत राहत होते. लवकरच त्यांना मानद डॉक्टरेट प्राप्त होणार होती मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट् विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांचे ते वडिल तर आरती मासिकचे संपादक कै. विद्याधर भागवत व प्रभाकर भागवत यांचे ते बंधु होत.