Bacchu Kadu Accident :
प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. आमदार कडू यांच्या अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यामुळे, कडू यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकाना आवाहन केलं आहे.
शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात आमदार कडू यांचा हा अपघात आज बुधवारी सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात कडू यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यात ४ टाके पडले तर पायालाही मार लागला आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालयात कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यकर्ते रुग्णालयात गर्दी करत असल्याने आमदार कडू यांनी ट्विट करुन आवाहन केलं आहे. ”आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”, असे कडू यांनी म्हटले.