माजी विद्यार्थी संस्थेचा पुढाकार
वैभववाडी | प्रतिनिधी : आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयच्या ‘यचवि आचिर्णे माजी विद्यार्थी संस्था’ या माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने “स्नेहसंमेलन व यशस्वीका 2022-23 चे प्रकाशन असा संयुक्त सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री.प्रभानंद (छोटू) शंकर रावराणे हे उपस्थित होते. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत, रयत शिक्षण संस्थेचा प्रतिनिधी म्हणून देखील मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करेन, त्याचबरोबर नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा सुधारू, शाळेच्या पाठीशी आम्ही आजही खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन प्रभानंद रावराणे यांनी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कारेकर सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशीलकुमार रावराणे, यचवि माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष गणेश रावराणे, यशस्वीका २०२२-२३ या अंकाचे संपादक सचिन हुंबे, संस्थेचे खजिनदार प्रकाश बुराण, संयोजक मिलिंद सावंत, ज्येष्ठ माजी विद्यार्थी यशवंत रावराणे, शिक्षणप्रेमी पंडित रावराणे, धोंडू जाधव, विजय रावराणे, सखाराम झोरे, उद्योजक राकेश रावराणे, माजी विद्यार्थी सतीश कडू, शाळेचे शिक्षक संजय तुळसकर सर, माने-रावराणे मॅडम, संदीप तुळसकर सर आणि मोठया संख्येने माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. आचिर्णे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यावेळी सुमधुर असे स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व परिचय संस्थेचे खजिनदार प्रकाश बुराण यांनी करून दिला. शाळेसाठी नेहमी सहकार्याची भावना असते, ग्रामस्थांचे पालकांचे विशेष सहकार्य मिळते आणि त्यातूनच शाळेसाठी काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते तसेच एकसंघपणे शैक्षणिक विकास करूया आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहुयात असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशीलकुमार रावराणे यांनी सांगितले. तदनंतर माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आणि शाळेच्या जडणघडणीचा आलेख मांडणाऱ्या ‘यशस्वीका २०२२-२३’ या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेच्या जडणघडणीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तसेच या शाळेचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी शाळेसाठी नवीन आणि उपयुक्त असे काहीतरी करणे गरजेचे आहे. संस्थेच्या माध्यमातून एकसंघपणे शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमात सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे असे आवाहन ‘यशस्वीका’चे संपादक सचिन हुंबे यांनी व्यक्त केले. तसेच यशस्वीकाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल माजी विद्यार्थी, संस्थेचे सभासद, जाहिरातदार व हितचिंतक यांचे आभार मानले.
माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एकत्र येत ज्या शाळेच्या आवारात शिक्षण घेतले त्या शाळेत पुन्हा एकदा शाळेच्या आठवणीने वर्ग भरला. प्रत्येकाचे शाळेविषयी असलेले प्रेम आणि आत्मीयता यावेळी दिसून येत होती. पालकांनी मुलांना मोबाईलचे दुरुपयोग समजावून सांगितले पाहिजेत तसेच आपल्या पाल्याचा आपण मित्र बनणे आजच्या काळाची गरज आहे असे मुख्याध्यापक श्री कारेकर सरांनी मत व्यक्त केले. या शिक्षणाच्या मंदिरात येताना कोणताही भेदभाव अथवा राजकारण नसावे, शिक्षणाचा दर्जा सुधारला की शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल असे शिक्षणप्रेमी पंडित रावराणे यांनी सांगितले. तुळसकर सर, संयोजक मिलिंद सावंत, ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी सौ.विशाखा सावंत यांनी शाळेविषयी आपले विचार मांडले. तसेच उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देखील आपल्या भाषणातून शाळेच्या जुन्या आठवणी व्यक्त केल्या. स्नेहसंमेलनाचे सुत्रसंचलन कु.निकिता पांगळे हिने केले तर संस्थेचे अध्यक्ष गणेश रावराणे यांनी माजी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनांचा स्वीकार करत असल्याचे सांगत संस्था पुढील वाटचालीत त्या सर्व गोष्टींचा विचार करेल आणि संस्था अजून बळकट करण्यासाठी सर्वांनी सभासद होऊन जोमाने कामाला लागुया असावं मत व्यक्त केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले; तसेच खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात स्नेहसंमेलन पार पडले.