राजापूर (वार्ताहर): आपल्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा तलाठी संघाचे वतीने सोमवार पासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात राजापूर तलाठी संघटनेने सहभागी होत आंदोलनाच्या पहिल्या टप्यात तहसिलदार यांना निवेदन सादर करून आपल्या सजाच्या चाव्या तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत.
राजापूर तहसिलदारांच्या वतीने उपलेखापाल श्री. राईन यांच्याकडे हे निवेदन सुपुर्द करण्यात आले. यावेळी राजापूर तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुरेश डकरे, जिल्हा संघटक संदीप कोकरे, श्री. पाटील, श्री. नरके, श्री. गुरव आदी उपस्थीत होते. संपूर्ण राज्यात सध्या ई- फेरफार, ई- चावडी, ई -पिक पाहणी व ई- हक्क् प्रणाली मध्ये कामकाज सुरू आहे. या प्रणालीमध्ये काम करताना तलाठी, मंडळ अधिकारी याना असंख्य अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तलाठी संघटनेने संबंधितांकडे या समस्या मांडूनही त्यावर योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सोमवार पासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
ई कामकाज प्रणालीतील त्रृटींबरोबरच आपल्या विविध २६ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी संघटनेमार्फत हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तलाठी सजाच्या चाव्या तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या आहेत. तर मागण्यांबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठींबा देत राजापूर तालुक्यातील तलाठी देखील सहभागी झाले आहेत.