ध्येयपूर्ती नंतर समाज विकासास अग्रक्रम आवश्यक समाजसेवक महेश गणवे

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ध्येय निश्चीत करुन उच्च ध्येयपूर्तीकरिता ज्ञान आत्मसात करणे अतिशय गरजेचे आहे , मात्र आपल्या ध्येयपूर्ती नंतर आपण ज्या समाजात वाढलो घडलो त्याचे प्रती आपले दायित्व म्हणून समाज विकासास अग्रक्रम देण्याची आवश्यकता समाजसेवक महेश गणवे यांनी मंडणगड येथे आयोजीत कार्यक्रमात व्यक्त केली. 8 जानेवारी 2023 रोजी लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षीक स्नेहसंमलेन पारीतोषीक वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमास माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, सौ. संपदा पारकर, प्राचार्य डॉ. राहुल जाधव, संस्थेचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, सहकोषाध्यक्ष सुनिल मेहता, संतोष चव्हाण, उदय भागवत, वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री. महेश गणवे म्हणाले कि, अनेक क्षेत्रात विद्यार्थी आपले करियर घडवू शकत असल्याने करियर निवडताना आपल्या काय करावयाचे आहे हे ठरवण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्यामुळे मोठा विचार करा व ध्येयपुर्तीसाठी सतत कार्यरत आहे ते गाठवण्यासाठी कर्तव्यपथावर सतत मार्गस्थ रहा, उच्च ध्येयपुर्तीकरिता माणूस मोटीव्हेट होणे गरजेचे असते त्यासाठी खऱ्या ज्ञानाची कास धरा. जीवनात कोणत्याही क्षेत्रात वावरताना माणासमध्ये सकारात्मकता असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करीत असताना महापुरुषांचे आदर्श घेत सकारात्मकता अंगीकारावी. बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता रोजगार, स्वंयरोजगाच्या संधी अंगीभुत गुणांवर काम केल्यास अधिक प्रशस्त होतील त्यामुळे समर्थ नागरीक व उत्तम योग्यता धारण केलेले विद्यार्थी तयार करण्यासाठी पायाभुत काम महाविद्यालयीन शिक्षण स्तरावर होत असल्याने या पायरीवर प्राध्यापक, शिक्षक उत्तम काम करीत असल्याने महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे त्यांनी यावेळी अभिनंदनही केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविक मध्ये प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी संस्था व महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याचा व वाटचालीसा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी विविध क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रांत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.