नवाबाग येथील मंजूर ब्रेक वॉटर बंधाऱ्याची केंद्रीय समिती कडून पाहणी…

Google search engine
Google search engine

मच्छीमारांना फायदेशीर ठरेल असाच बंधारा उभारणार : दिले आश्वासन

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ले नवाबाग येथील मंजूर असलेल्या ब्रेक वॉटर बंधाऱ्याची पाहणी आज फिशरीज आणि मेरीटाईम बोर्डच्या केंद्रीय समितीने केली. नवाबाग किनाऱ्यापासून बंदरापर्यंत अशा या 500 मीटर लांबीच्या बांधार्‍याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान समितीने मच्छीमारांची चर्चा करून मच्छीमारांबरोबर सर्वांना फायदेशीर ठरेल असाच बंधारा उभारला जाईल असे आश्वासन दिले. नवाबाग येथील हा ब्रेक वॉटर बंधारा मंजूर आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने कामापुर्वीची पूर्तता करून ठेवलेली आहे. मात्र शासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याने आणि या किनाऱ्याच्या मुखाशी आता नवीन पूल उभा राहिल्याने त्याचा त्रास या बंधाऱ्याला आणि पर्यायाने मच्छीमारांना होणार का याची पाहणी करण्यासाठी ही समिती आली होती. मत्स्यखात्याचे मुंबईतील कार्यकारी अभियंता रमेश सिंग, सुनिता चित्तलपुडी, सी.डब्लू.पी.एस.चे अधिकारी मधुकर पाटील आदी अधिकाऱ्यानी मच्छीमारांना विश्वासात घेत ब्रेकवाँटर बांधाऱ्याबाबत चर्चा केली.

यावेळी मच्छीमारांच्या वतीने बोलताना आधुनिक रापण संघाचे जिल्हाध्यक्ष दादा केळूसकर म्हणाले की, मच्छीमारांच्या हितासाठी हे बंधाऱ्याचे काम होणे गरजेचे आहे. यासाठी येथील स्थानिक मच्छीमार अनेक वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही समिती आली आहे. या समितीने येथे पाहणी करून स्थानिक मच्छीमारांची संवाद साधला आणि त्यांचे म्हणणे ऐकून मंजूर असलेल्या ठिकाणीच बंधारा करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी धी वेंगुर्ला मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुबल, अशोक खराडे, सुधाकर वेंगुर्लेकर, बाबी रेडकर, पारंपरिक रापण संघाचे सुबोध खडपकर, देवीदास मोठे, प्रदिप सागवेकर, आनंद वेंगुर्लेकर, दाजी खोबरेकर, मोहन सागवेकर, ज्ञानी सागवेकर, योगेंद्र मोरजे, आशिष तोरस्कर, जाँनी आल्मेडा, हेमंत मलबारी, ज्ञानदेव तांडेल, एरवण फर्नाडिस, किशोर सागवेकर, गणेश केरकर, मनोहर टांककर, आनाजी तांडेल आदी प्रमुख मच्छीमार बांधव उपस्थित होते.दरम्यान दिलेल्या आश्वासनाची नक्कीच ते पूर्तता करतील आणि मच्छीमारांना फायदेशीर ठरेल असाच बंधाऱ्याचा नकाशा बनवून ते तो उभारतील असा आम्हाला विश्वास असल्याचे दादा केळुस्कर यांनी सांगितले.