५४ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल लंपास; पोलिसात तक्रार दाखल
कणकवली : तालुक्यातील कनेडी रस्त्यावरील सांगवे-संभाजीनगर येथील पामतेल समोरील वासुनंदा ह्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरातील ५४ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत शेजारील श्री. सावंत यांनी बंद असलेल्या बंगल्याचे मागील दरवाजा उघडे असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिस पाटील यांना कळविले. पोलिस पाटील यांनी घर मालक जयश्री पुंडलिक सावंत (५७) रा.सांगवे-संभाजीनगर पामतेल यांना कळविले. दरम्यान मुंबई येथे असलेले घर मालक हे गावी परतले व त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वासुनंदा बंगला ७ सप्टेंबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत बंद होता. तर बंद बंगल्यातील इन्व्हर्टरची बॅटरी, एलईटी टीव्ही, दोन गॅस सिलेंडर, सहा खुर्च्या, तीन गिझर, जागवार कंपनीचे २० स्टीलचे नळ, पंच धातुचे तीन देव, इलेक्ट्रॉनिक शो पिस, तीन फ्लॅश टँक, दोन गॅस ग्रँडर मिक्सर, चार कुकर, अॅल्युमिनियमचे चार टोप, दोन स्टील परात, डिनर सेट, वाट्या-चमचे, दहा साड्या, पाच ड्रेस असे मिळून ५४ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच, कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, कनेडी दूरक्षेत्राचे हवालदार श्री.देसाई यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.