आजी-आजोबांच्या गप्पागोष्टी, भजनामध्ये लांजा नं. ५ शाळेतील मुले झाली दंग…

आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न 

लांजा (प्रतिनिधी) जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. ५ मध्ये, हक्काच्या माणसांना आपल्या नात-नातूची शाळा पाहण्याचा योग, ‘आजी आजोबा दिवस’ या शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे घडून आला.

आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे, पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे नाते अधिक दृढ करणे यासाठी शासनाने ‘आजी आजोबा दिवस’ शाळेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाला

जवळपास १५० पेक्षा जास्त आजी-आजोबा आपल्या नातवंडांच्या शाळेत उपस्थित झाले.

शाळेच्या प्रवेशद्वारापासून सुंदर काढलेली रांगोळी, मुलांचे ढोलपथक आणि मुलींची लेझीम पथकाने सर्वांचीच मने जिंकून घेतली. आगमन पथावर विद्यार्थी दुतर्फा राहून पुष्पवृष्टी करुन सर्वांचे स्वागत केले. औक्षण करून ज्येष्ठ आजीच्या थरथरत्या हाताने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रम स्थळी खुर्च्या आजीआजोबांसाठी होत्या पण अनेक आजीआजोबांनी आपल्या नातू, नातीला मांडीवरच घेऊन बसवले. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आजीआजोबांचा परिचय करुन दिला. नंतर नातवंडांच्या हस्ते आजीआजोबांचे पाद्यपूजन व औक्षण करून पुष्प आणि खाऊ देऊन सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थी म्हणजेच नातवंडे कल्याणी माजळकर, प्रणव सुर्वे, वैष्णवी दळवी, ऋतिका दवडते, वरद पन्हाळकर, शुभम हिंगणे, पार्थ दळी, श्रीनिवास महाजन, रुई बेर्डे व अथर्व वाघाटे यांनी आपल्या आजीआजोबांविषयीचे अनुभव, स्वभाव, गुणविशेष, त्यांचे कुटुंबातील महत्त्वपूर्ण स्थान सुंदरपणे भाषणातून अधोरेखित केले.

यानंतर आजी आजोबांसाठी ठेवलेला ‘चिट्टी तशी कृती’ हा खेळ घेतला. अनेक आजीआजोबांनी अनुभवलेली शाळा, आवडीनिवडी, कुटुंब व संस्कार, आजीबाईचा बटवा, जुनी शिक्षण व जीवनपद्धती, गाणी, भजन यासारख्या विविध विषयांवर मनमुरादपणे हसतखेळत गप्पा मारल्या व मार्गदर्शनही केले.

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिक्षकवृंदानी केलेला ‘सेल्फी पॉईंट’. आधुनिकतेची सांगड घालत सर्व आजीआजोबांनी आपल्या नातूनाती यांच्याबरोबर सेल्फी काढले.

शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण यांनी या कार्यक्रमाचा हेतू आणि माहिती सांगितली. अनेक आजीआजोबांनी या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले, तसेच शाळेचे आभार मानले. शेवटी सर्व आजीआजोबांचा एकत्रित फोटो काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी लांज्याचे गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर , विस्तार अधिकारी विनोद सावंग , केंद्रप्रमुख विजय विश्वासराव, व्यवस्थापन समिती सदस्सय गुरुप्रसाद देसाई व संजना आग्रे , माता पालक संघाच्या योगिनी सावंत व साक्षी वाघाटे , शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात आजीआजोबा उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील प्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंदानी उत्तम सहकार्य केले आणि शाळेतील ‘आजी आजोबा दिवस’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.