तहसीलदार कार्यालयाच्या गेटवर कारवाई करणाऱ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर!
कणकवली : तालुक्यातील तहसिलदार कार्यालयाच्या आवारात हेल्मेट न वापरणाऱ्या, तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर सिंधुदुर्ग आरटीओकडून कारवाईचा बडगा सुरू होता. या कारवाईला कारवाईला भाजपा व ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र यावरून आरटीओच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि भाजपा, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वादंग निर्माण झाला.
मात्र तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात परवानगी शिवाय होणाऱ्या कारवाईला विरोध झाला. अखेर तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे झालेल्या चर्चे अंती आवारात केलेल्या वाहनांवरील कारवाईची रक्कम परत देण्याबाबत तोडगा काढण्यात आला . तसेच आधी जनजागृती करा मग कारवाई करा, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती जरी अशी आली तरी आरटीओ च्या कामकाजावर नाराजी देखील मोठ्या प्रमाणात आहे. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या होत्या.
आमदार नितेश राणे यांनी माहिती मिळताच थेट कणकवली तहसीलदार कार्यालय गाठले. गोरगरीब नागरिक आपल्या कामासाठी तहसीलदार कार्यालयात येतात. मात्र तुम्ही जर कारवाई करत असाल तर याद राखा! असा सज्जड दम देखील आरटीओच्या कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरला. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, समीर प्रभू गावकर, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदा चव्हाण, आदि उपस्थित होते.
पुढे श्री. राणे म्हणाले, अवैध वाहतूकीवर कारवाई करा किंवा हायवेचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करा. मात्र अशा नवीन स्टाईल काढून कारवाई करू नका. आपण ज्या कार्यालयांच्या आवारात कारवाई करत आहात त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील हे माहीत नव्हतं. अशा स्थितीती हे अधिकार तुम्हाला कोणी दिले ? असाही सवाल त्यांना केला. दरम्यान यावेळी आमदार नितेश राणे यांनी आरटीओ निरीक्षक श्री. काळे यांना फोन करून त्यांना या प्रकाराबाबत माहिती निदर्शनास आणून दिली. दरम्यान अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी तुम्हाला कणकवली मिळते काय ? ज्या ज्या वाहन चालकांवर कारवाई केलात त्यांचे पैसे मागे करा, अशी मागणी केली. तसेच त्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना द्या असेही श्री. काळे यांना सांगितले. दरम्यान श्री. राणे यांनी त्या आरटीओच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, तुमच्या कारवाईमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. यापुढे कारवाई महामार्गावर करा. सरकारी कार्यालयांच्या गेटवर कारवाई नको अशा सुचना देखील त्या कर्मचाऱ्यांना दिल्या. तर आरटीओचे कारवाई करणारे कर्मचारी बाजू मारून आपण गेटच्या बाहेर कारवाई करत होतो असें सांगत होते. मात्र त्यांचा खोटेपणा नागरिकांनी विडिओ – फोटो दाखवत उघड केला.